मराठी चित्रपटांना स्क्रीन न मिळण्याचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर आला. राज्यात असलेल्या एक पडदा चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवले जातात. पण, हे चित्रपटगृह हळूहळू बंद पडू लागले आहेत. त्याबद्दल चिंता व्यक्त करत महाराष्ट नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मराठी सिनेमा क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात बैठक घेणार असल्याचेही ते म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमुळे सिंगल स्क्रीन चित्रपटगृह शेवटच्या घटका मोजू लागले आहेत. राज्यातील अनेक सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये मराठी सिनेमाला प्राधान्य दिले जाते. पण, हेच चित्रपटगृह आता बंद पडू लागली असून, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याकडे लक्ष वेधले आहे.
५० चित्रपटगृह बंद पडण्याच्या मार्गावर, अमेय खोपकर काय म्हणाले?
"गेल्या काही वर्षात देशातील सिंगल स्क्रीन थिएटर ची संख्या 20,000 ते 5500 (मरणासन्न) इतकी घटलीये. पुण्यातील 30 पैकी 9 बंद. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील 400 पैकी 50 थिएटर कायमची बंद पडलीत, तर 50 बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उरलेल्या थिएटर्समध्ये सिनेमा जगवायचा असेल तर मराठी सिनेमाकर्त्यांनी एकत्र यायला हवं (आतातरी). मी लवकरच तारीख जाहीर करेन", असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.
अमेय खोपकर घेणार बैठक
सिंगल स्क्रीन चित्रपटगृहाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त करण्याबरोबरच यासंदर्भात लवकरच बैठक घेण्याचे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी सिनेमा क्षेत्रातील व्यक्तींमधील एकजुटीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकत्र येण्याचं आवाहन करताना त्यांनी 'आतातरी' या शब्दावर जोर दिला आहे.