अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) 'क्रिश' (Krrish) सिनेमाची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये क्रेझ आहे. 'कोई मिल गया'चा सीक्वेल 'क्रिश' होता ज्यामध्ये प्रियंका चोप्रा आणि हृतिकची जोडी होती. हृतिकने सुपरहिरोची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांवर कायमची छाप पाडली. वडील राकेश रोशन यांनीच सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. नंतर क्रिश ३' सुद्धा आला. आता 'क्रिश ४'ची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र या सिनेमाचं दिग्दर्शन राकेश रोशन नाही तर स्वत: हृतिकच करणार आहे. कारण राकेश रोशन यांनी दिग्दर्शनातून निवृत्ती जाहीर केली आहे. दिग्दर्शनाविषयी हृतिकने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
हृतिक रोशन नुकताच एका इव्हेंटमध्ये पोहोचला होता. इथे त्याला 'क्रिश ४' बद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, "मला प्रोत्साहनाची गरज आहे. मी खूप नर्वस आहे. त्यामुळे मला शक्य असेल तितकं प्रत्येकाने प्रोत्साहन द्या. धन्यवाद."
यावरुन 'क्रिश ४'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी हृतिकच्या खांद्यावर आहे हे कन्फर्म झाले आहे. 'क्रिश'चा मोठा चाहतावर्ग पाहता मेकर्सला कुठेही चूक करुन चालणार नाही. तसंच सिनेमाचं बजेट खूप मोठं असणार आहे आणि त्यात तडजोड करु शकत नाही असं राकेश रोशन म्हणाले होते. हृतिक सध्या 'वॉर २'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर तो 'क्रिश ४'चं काम सुरु करेल अशी शक्यता आहे.
'क्रिश ४' मध्ये रेखा आणि प्रिती झिंटा कमबॅक करतील अशी चर्चा आहे. शिवाय नोरा फतेहीचंही नाव समोर आलेलं आहे. मात्र अद्याप सिनेमाची स्टारकास्ट फायनल झालेली नाही.