Join us

काय सांगता! मार्व्हलचा सुपरहिरो 'मल्हारी' गाण्यावर थिरकला, What if..? सीरिजमधील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:59 IST

What if..? 3 या हॉलिवूडच्या अॅनिमिटेड सीरिजमध्ये बाजीराव मस्तानीमधील मल्हारी गाण्यावर सुपरहिरो नृत्य करताना दिसून आला

२०१५ साली आलेल्या 'बाजीराव मस्तानी' सिनेमा आजही सर्वांच्या आवडीचा सिनेमा असेल यात शंका नाही. या सिनेमात रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, मिलिंद सोमण या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. संजय लीला भन्सालींनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमातील एक गाणं चांगलंच गाजलं ते म्हणजे 'मल्हारी'. रणवीर सिंगचं खास नृत्य आणि धमाकेदार चाल असल्याने 'मल्हारी' गाणं आजही थिरकायला भाग पाडतं. याच गाण्याची भुरळ चक्क हॉलिवूडला पडली असून मार्व्हल वेबसीरिजमधील सुपरहिरो या गाण्यावर नाचताना दिसलाय. 

मल्हारी गाण्यावर थिरकला मार्व्हलचा सुपरहिरो

मार्व्हलची सध्या चर्चेत असलेली वेबसीरिज म्हणजे What if..?. या सीरिजचा तिसरा सीझन सध्या सुरु आहे. What if..? 3 मध्ये सुपरहिरो किंगोची धमाकेदार एन्ट्री होते. त्यावेळी 'मल्हारी' गाण्याची चाल घेत नवीन शब्द त्यामध्ये मिसळत सुपरहिरो किंगो नाचताना दिसतो.  रणवीर सिंगशीच मिळत्याजुळत्या खास डान्स स्टेप किंगो करताना दिसतो.  'जीत है हमारी' असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं आणि या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.

संजय लीला भन्साली यांनी 'मल्हारी' या मूळ गाण्याला संगीत दिलं होतं. हेच गाणं मार्व्हलसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सीरिजमध्ये नवीन अंदाजात ऐकणं हा निश्चितच एक चांगला अनुभव आहे. संजय लीला भन्सालींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ते सध्या रणबीर कपूर, आलिया भट आणि विकी कौशल यांच्यासोबत 'लव्ह अँड वॉर' सिनेमाचं शूटिंग करत आहेत. २० मार्च २०२६ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :रणवीर सिंगसंजय लीला भन्साळीबॉलिवूडहॉलिवूड