होळी हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ठिकठिकाणी मोठी होळी पेटवून धुळवडीचे रंग खेळले जातात. होळीनिमित्त घरोघरी पुरणपोळीचे गोड धोड जेवण बनवण्याची परंपरा आहे. होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने दरवर्षी होळीचा सण साजरा करतात.
मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीदेखील होळीनिमित्त पुरणपोळ्या बनवल्या आहेत. याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या या कणकेच्या गोळ्यात पुरण भरुन त्याची पुरणपोळी लाटताना दिसत आहेत. पुरणपोळी लाटून झाल्यानंतर ती तव्यावर ठेवायची ट्रिकही ऐश्वर्या यांनी या व्हिडिओतून दाखवली आहे. ऐश्वर्या यांची ही भन्नाट ट्रिक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. पुरणपोळी झाल्यानंतर त्यावर साजूक तूप त्यांनी टाकलं आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे.
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं आहे. ते सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. अनेक रील्स व्हिडिओ नारकर कुटुंबीय शेअर करत असतात. चाहतेही त्यांच्या या रील व्हिडिओला पसंती दर्शवितात. ऐश्वर्या आणि अविनाश दोघेही गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.