Hina Khan Post: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या हिना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. काही महिन्यांपूर्वीच हिनाने ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. सध्या हिना यावर उपचार घेत आहे. अलिकडेच हिना खानने 'बिग बॉस १८' (Bigg Boss 18) या शोमध्ये हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा शो होस्ट करत आहे. किमोथेरपीनंतर ती पहिल्यांदाच टीव्हीवर झळकली. या शोमध्ये तिला स्पेशल गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. परंतु 'बिग बॉस १८'मध्ये अभिनेत्रीचं सलमानने केलेलं स्वागत पाहून ती भारावली आहे. या संदर्भात तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
हिना खानने सोशल मीडियावर 'बिग बॉस १८' मधील सलमान खानसोबतचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहलंय, "स्वभावाने नम्र आणि दयाळू असलेल्या सलमान खानला मी जेव्हा भेटते तेव्हा त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळतात. आताची वेळ थोडी वेगळी होती. तरी, दिवसभर उभा राहून दीर्घ काळ केलेल्या शूटिंगनंतर थकलेला असतानाही मला भेटण्यासाठी तो आला. त्याच्या या कृतीनं खरोखर माझं मन जिंकलं. शूट झाल्यानंतर त्याने मला बोलवलं. त्यानंतर जवळपास तासभर माझ्यासोबत बसून सलमानने चर्चा केली. माझ्या तब्बेतीबद्दल विचारपूस केली आणि माझा आत्मविश्वास वाढवण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याने केवळ आपले अनुभव माझ्यासोबत शेअर केले नाही तर तिथून निघताना मी पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वासी असल्याची खात्री मला त्याने करून दिली. शिवाय मी लवकरात लवकर बरी होईन अशी आशाही माझ्या मनात त्याच्या बोलण्याने निर्माण झाली."
पुढे हिना खानने म्हटलंय, "सांगायचं कारण एवढंच, त्याला हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती. तरीदेखील त्याने ते केलं. तो कोण आहे? तो आपल्या कामात किती व्यस्त आहे? या सगळ्याची पर्वा न करता त्याने माझी भेट घेतली आणि आपुलकीने विचारपूस केली. त्याचे प्रेमाचे दोन शब्द माझ्यासाठी आधारच नाहीत तर धडा देणारे आहेत आणि तो धडा मी कधीच विसरू शकणार नाही. सलमान तुझे मनापासून आभार तू जसा आहेस तसाच राहा! तुझी मी कायम ऋणी राहीन." अशी भावनिक पोस्ट हिनाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.