अनिल कपूर(Anil Kapoor)मुळेच 'परिंदा' (Parinda Movie) चित्रपटातून त्यांची भूमिका निसटल्याचा खुलासा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी इतरही अनेक खुलासे केले आहेत. नुकतेच नाना पाटेकर यांनी अनिल कपूरसोबत मनमोकळेपणाने संवाद साधला. १९८९ साली विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित चित्रपटात जॅकी श्रॉफने नाना पाटेकर यांची जागा घेतली. याबाबत नाना पाटेकर बोलत होते. हा बदलही अनिल कपूरमुळेच झाल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले.
नाना पाटेकर अनिल कपूरला म्हणाले, "परिंदाच्या वेळी तू मला खूप त्रास दिलास. मी तुला सांगतो, चित्रपटात मी भावाची भूमिका करणार होतो. आपण रिहर्सलही केली होती. अनिलमुळे मला काढून टाकल्यानंतर जॅकीला चित्रपटात कास्ट करण्यात आले. ." ते पुढे म्हणाले की, "तथापि, मी त्यांचे आभार मानू इच्छितो, कारण त्याने जॅकीचा आग्रह धरला नसता तर मला 'अण्णा'ची भूमिका मिळाली नसती."
अशी निसटली नानांच्या हातून भूमिका
अनिलने स्पष्ट केले की, "मी चुकीचा असू शकतो, परंतु मला वाटले की 'परिंदा'मधील माझ्या भावाच्या भूमिकेसाठी जॅकी हा सर्वोत्तम पर्याय असेल." ते वैयक्तिक नसल्याचे अनिल कपूरने सांगितले. त्याने सहजच दिग्दर्शकाला एक सूचना दिली. अंतिम निर्णय फक्त दिग्दर्शकाचा होता, असे अनिल कपूरने म्हटले. यावर नाना म्हणाले, "पण तू स्टार होतास, नक्कीच त्यांनी तुझे ऐकले असते. मात्र, जॅकीने चित्रपटात चांगले काम केले. त्याच्या अभिनयासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता." परिंदामध्ये अनिल कपूरसोबत जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले.