टीव्हीवर गाजलेल्या ‘’कसौटी जिंदगी की २’’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका करणाऱ्या एरिका फर्नांडिस हिने एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. मागच्या काही काळापासून मनोरंजन जगतापासून दूर असलेली आणि सध्या दुबईमध्ये स्थायिक झालेली एरिका ही सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी सतत संपर्क ठेवून असते. दरम्यान, एरिका हिने तिच्या मागील रिलेशनशिपबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. त्या नात्यामध्ये आपल्याला मारहाण झाल्याचा तसेच गैरवर्त झाल्याचा दावा तिने केला आहे.
एरिका फर्नांडिस हिने हा सनसनाटी गौप्यस्फोट शार्दुल पंडितच्या पॉडकास्टमध्ये आपल्या जुन्या रिलेशनशिपबाबत बोलताना केला. ती म्हणाली की, अनेकदा ही अभिनेत्री आहे, म्हणजे तिचे अनेक अफेअर्स असतील असं समजून लोक तुमच्यासोबत वागतात. माझ्या आधीच्या रिलेशनशिपमध्येही असंच घडलं होतं. मी सध्यातरी अभिनेत्री आहे. मात्र तो कुठे दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला असता, तर मला हे क्षेत्र सोडावं लागलं असतं. माझ्या त्या नात्यामधील ती एक मोठी अट होती. तो अभिनेता नव्हता, तर एक बिझनेसमन होता. मी त्याला पार्ट टाईम बिझनेसमन म्हणेन. त्याच्यापासून मी दूर झाले ही बाब माझ्या दृष्टीने चांगलीच झाली, असंही ती म्हणाली.
एरिका पुढे म्हणाली की, मी सध्या सिंगल आहे. कारण मी माझ्या जीवनात पुढे जाऊ शकले नाही. या नात्याचं ओझं, त्रास, मन दुखावणं, अविश्वास हे सर्व माझ्यासोबत घडलं. जीवनात मी खूप चढउतार पाहिले आहेत. मात्र या अनुभवाने मला आकार दिलाय, असंही ती म्हणाली.