Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनेक महिन्यांपासून अन्नत्याग, काही दिवसांपासून पाणीही प्यायलं नाही; 'सोढी'च्या मैत्रिणीने दिले अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 13:18 IST

गुरुचरण सिंह कोणाचंच ऐकेना, काय म्हणाली त्याची मैत्रीण?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता गुरुचरण सिंहची (Gurucharan Singh) तब्येत खालावली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने रुग्णालयातील व्हिडिओ शेअर केला होता. तर आता त्याच्या मैत्रिणीने गुरुचरणच्या तब्येतीसंदर्भात अपडेट्स दिले आहेत. ना पाणी पितोय ना कोणाचं ऐकतोय अशी तक्रार तिने केली आहे. हे ऐकून सोढीचे चाहते चिंतेत पडलेत.

भक्ती सोनी ही गुरुचरण सिंहची मैत्रीण आहे. तो गायब झालेला असतानाही भक्ती सोनीने मुलाखती दिल्या होत्या. तर आताही तिने एका मुलाखतीत गुरुचरणच्या तब्येतीची माहिती दिली. ती म्हणाली, "गुरुचरण गायब झाल्यानंतर पुन्हा घरी परतला. तेव्हापासून त्याने अन्नत्याग केला आहे. २२ एप्रिल २०२४ रोजी तो गायब झाला आणि २६ दिवसांनंतर परतला. मे २०२४ पासून तो फक्त लिक्वीडवर आहे. त्याने काहीही खाल्लेलं नाही. आता तर त्याने पाणीही पिणं सोडलं आहे. १९ दिवस झाले त्याने पाणी प्यायलं नाही. यामुळे स्वाभाविक आता त्याला अशक्तपणा आळा आहे. तो बेशुद्ध झाला होता तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या तो डॉक्टरांचंही ऐकत नाही. त्याला हवं तेच तो करत आहे. पाणी पिण्यासाठी आम्ही सगळेच त्याला आग्रह धरतोय पण तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. "

ती पुढे म्हणाली, "गुरुचरण गायब होण्याच्या आधीपासूनच आजारी होता. आम्ही तेव्हापासून त्याच्या तब्येतीची काळजी करत आहोत. घरी परतल्यानंतर त्याने इंडस्ट्रीत पुन्हा काम मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण इंडस्ट्रीकडून जसा प्रतिसाद हवा होता तसा मिळाला नाही. म्हणूनच त्याने खाणं पिणंच सोडलं. तो अध्यात्मिक आहे. जेव्हा तो गायब झाला तेव्हा त्याची हिमालयात जायची इच्छा होती. त्याला त्याच्या गुरुंचा फोन आला तेव्हा कुठे तो परत आला. त्याला संन्यास घ्यायचा होता कारण त्याला या वास्तविक जगाचा कंटाळा आला आहे."

टॅग्स :टिव्ही कलाकारआरोग्यतारक मेहता का उल्‍टा चश्‍माहॉस्पिटल