Join us

'नातवाचे फोटो पाठवताच त्यांनी आम्हाला ब्लॉक...' गश्मीर महाजनीचा वडिलांबाबत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 09:05 IST

वडिलांच्या जगण्याची पद्धतच वेगळी होती...गश्मीर मनमोकळेपणाने बोलला.

मराठीतील सर्वात हँडसम अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं १५ जुलै रोजी निधन झालं. एवढ्या देखण्या अभिनेत्याचा असा शेवट व्हावा हे कोणालाच पटलं नाही. याचा सगळा दोष नेटकऱ्यांनी मुलगा गश्मीर महाजनीवर (Gashmeer Mahajani) लावला. मुलाचं वडिलांकडे लक्ष नव्हतं, ते हलाखीच्या परिस्थितीत राहत होते अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावर बोलल्या गेल्या. आता अखेर गश्मीरने माध्यमांसमोर येऊन त्याची बाजू नक्की काय आहे याचा खुलासा केला आहे.

वडिलांच्या निधनानंतर जवळपास दीड महिन्यांनी गश्मीर महाजनी माध्यमांसमोर आला आहे. गेले काही दिवस तो इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत होता. आता त्याने कॅमेऱ्यासमोर येऊन 'मित्रम्हणे' या मुलाखतीत नक्की काय घडलं हे सांगितलं आहे. गश्मीर म्हणाला, "वडिलांची राहण्याची पद्धतच वेगळी होती. ते २० वर्षांपासून वेगळेच राहायचे. त्यांना हवं तेव्हा ते आम्हाला घरी भेटायला यायचे आणि २ महिने राहून परत निघून जायचे. त्यांना एकटं स्वतंत्र राहायला आवडायचं. आधी ते मुंबईतल्या फ्लॅटमध्ये नंतर तळेगावला राहायला गेले. त्यांना कोणी केअरटेकरही नको होता. स्वत:ची काळजी स्वत:च घेणार असा त्यांचा स्वभाव होता. अगदी स्वयंपाकही ते स्वत:च करायचे."

नातवाचे फोटो पाठवले तर ब्लॉक केलं

गश्मीर पुढे म्हणाला, "मला मुलगा झाला तेव्हा मला वाटलं की नातवाला आजोबांचा सहवास लाभावा.त्यांनी नातवाचं चेहरा फक्त त्याच्या जन्माच्या वेळी पाहिलं होतं. म्हणून मी आणि आईने त्यांना घरी या अशी बरीच विनंती केली. पण ते आले नाहीत. मी त्यांना व्हॉट्सअॅपवर मुलाचे फोटो, व्हिडिओ पाठवायचो. ते पाहून तरी ते घरी येतील त्यांचं मन विव्हळेल असं वाटलं मात्र त्यांनी मला ब्लॉक केलं. आईने फोन केले तर  तिलाही ब्लॉक केलं. नंतर बायकोलाही ब्लॉक केलं. आता त्यांनी असं का केलं असेल हेही मी सांगू शकतो. फोटो पाहून ते हळवे होणार त्यांना यावंसं वाटणार नातवाला आजोबांची सवय होणार हे सगळं त्यांना नको होतं म्हणून त्यांनी आम्हाला ब्लॉकच करुन टाकलं."

गश्मीरने वडिलांच्या जीवनाचे अनेक पैलू या मुलाखतीत उलगडले आहेत. रवींद्र महाजनी यांची जगण्याची पद्धतच वेगळी होती. त्यांना कुटुंबासोबत राहणं आवडायचं नाही त्यांना स्वतंत्र राहायला आवडायचं. दुसरं कोणी त्यांचं काम करावं हे त्यांना मान्यच नव्हतं असंही तो म्हणाला. पण ट्रोलर्सचा मला फरक पडत नाही असंही त्याने स्पष्ट केलं. 

टॅग्स :गश्मिर महाजनीरवींद्र महाजनीमराठी चित्रपटमराठी अभिनेतासोशल मीडिया