'बाहुबली' सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'सलार' सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन 'केजीएफ' सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन करणारा प्रशांत नील करत आहे. काही दिवसांपूर्वीच चर्चा सुरू होती की, प्रभास आणि प्रशांत सोबत काम करणार आहेत. बुधवारी २ डिसेंबरला सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सध्या या सिनेमाचं प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू आहे.
हा एक अॅक्शन सिनेमा असेल आणि पोस्टरमध्ये प्रभासचा लूक फारच इंटेन्सही दिसत आहे. हे फर्स्ट लूक पोस्टर शेअरर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'सर्वात जास्त हिंसक एका व्यक्तीला सर्वात जास्त हिंसक म्हणतात'. प्रशांत नीलने हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलंय.
असेही सांगितले जात आहे की या सिनेमाचं शूटींग पुढील वर्षाच्या मध्यात सुरू होईल. पण अजूनही सिनेमाच्या इतर स्टारकास्टबाबत सांगण्यात आलेलं नाही. मात्र हे ठरलंय की, हा सिनेमा भारतातील ५ भाषांमध्ये रिलीज केला जाईल.
प्रशांतच्या 'केजीएफ चॅप्टर २'चं शूटींग पूर्ण झाल्यावर तो या सिनेमावर काम सुरू करेल. प्रभासकडेही सध्या तीन सिनेमे आहेत. तो हैद्राबादमध्ये 'राधे श्याम'चं शूटींग करत आहे. यानंतर तो दीपिका पादुकोनसोबत नाग अश्विनच्या सिनेमाचं काम सुरू करेल. तसेच प्रभास ओम राउतच्या 'आदिपुरूष' मध्येही दिसणार आहे. यात तो रामाची भूमिका साकारणार आहे. यात सैफ अली खान लंकेश म्हणजे रावणाची तर क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत असतील.