Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गाणारे व्हायोलिन'चे सूर हरपले; प्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 11:46 IST

Prabhakar jog: प्रभाकर जोग हे गाणारे व्हायोलिन या नावाने प्रसिद्ध होतं. या नावाने त्यांनी अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रमदेखील केले होते. 

प्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग (prabhakar jog) यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते. प्रभाकर जोग हे 'गाणारे व्हायोलिन' या नावाने प्रसिद्ध होते. या नावाने त्यांनी अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रमदेखील केले होते. 

तब्बल ६ दशकांहून अधिक काळ त्यांनी व्हायोलिन वादक, संगीतकार आणि संगीत संयोजक म्हणून काम केलं होतं. मराठीसह हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. वयाच्या १२ व्या वर्षीपासून ते या क्षेत्रात कार्यरत होते. लहान असताना ते पुण्यातील वाड्यांमध्ये  सव्वा रुपया आणि नारळ या मानधनावर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करायचे. त्यानंतर पुढे पुढे या क्षेत्रात प्रगती करत त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. ‘गीतरामायणा’तील गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

"ज्येष्ठ संगीतकार, प्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्या निधनानं भारतीय संगीतातील महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या व्हायोलिन वादनानं गानरसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मनमुराद आनंद दिला. स्वर्गीय सुधीर फडके तथा बाबूजींच्या ‘गीतरामायणा’तील गाण्यांना त्यांच्या व्हायोलिनची समर्थ साथ लाभली होती. व्हायोलिनला गायला लावण्याची किमया लाभलेले ते जादूगार होते. त्यांचं निधन ही राज्याच्या संगीत, कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दाxत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

जोग यांना मिळालेले पुरस्कार-

१. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार (जुलै २०१७)

२. २०१७ सालचा गदिमा पुरस्कार

३. महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (२०१५)

४. कैवारी, चांदणे शिंपीत जा आणि सतीची पुण्याई या चित्रपटांना दिलेल्या संगीताला ’सूरसिंगार पुरस्कार’५. पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे दिला जाणारा वसुंधरा पंडित पुरस्कार (२०१३) 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड