Rahul Fazilpuria : प्रसिद्ध बॉलिवूड, हरियाणवी सिंगर राहुल फाजिलपुरियावर गुरुग्राम येथे अज्ञातांनी गोळीबार केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बादशाहपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एसपीआर रोडवर हा हल्ला झाला. हल्लेखोर मागून दुसऱ्या कारमधून आले आणि त्यांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्यानंतर फाजिलपुरियाने तिथून पळ काढला. दरम्यान,या हल्ल्यातून फाजिलपुरिया थोडक्यात बचावला आहे. या घटनेता पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. राहुल फाजिलपुरिया हा फाजिलपूर या त्याच्या गावातून जात असताना त्याच्यावर हा गोळीबार करण्यात आला. गुरुग्रामच्या सदर्न पेरिफेरल रोड वरून तो त्याच्या पांढऱ्या रंगाच्या थार मधून जात असताना मागून पंच कारमधून ५ जण आले आणि त्यांनी राहुलचा पाठलाग केला. परंतु, प्रसंगावधान दाखवत राहुल त्यांच्या तावडीतून स्वत: ची सुटका केली. सध्या या प्रकरणी पोलीस पुरावे गोळा करत आहेत. मात्र, हल्लेखोर कोण होते? त्यांनी फाजिलपुरियावर हल्ला का केला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
कोण आहे राहुल फाजिलपुरिया?
राहुल फाजिलपुरियला राहुल यादव या नावाने देखील ओळखला जातो. सुप्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादवचा तो जवळचा मित्र आहे. फाजिलपूरिया 'चुल' या रॅप सॉंगने प्रसिद्ध झाला. हेच गाणं सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्या 'कपूर अॅंड सन्स' चित्रपटामध्ये चित्रित करण्यात आलं होतं. हे गाणं गायल्यानंतर फाजिलपुरिया प्रसिद्धीच्या झोतात आला. फाजिलपुरिया हा हरियाणवी आणि त्याच्या रॅप सॉंगसाठी लोकप्रिय आहे. त्याचे आतापर्यंत अनेक अल्बम्स, गाणी प्रदर्शित झाले आहेत.
याशिवाय १६ एप्रिल २०२४ ला हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पक्षाने (जेजेपी) च्या तिकिटावर गुरुग्राम लोकसभा मतदारसंघातून राहुलने निवडणून लढवली. पण, या निवडणुकीत तो पराभूत झाला.