गेल्या कित्येक दिवसापासून चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा अखेर शुक्रवारी(१७ जानेवारी) सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमातून भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आणि त्यांनी १९७५ ते १९७७ या काळात देशात लावलेल्या आणीबाणीवर भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमात कंगनाने इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे.
'इमर्जन्सी' सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाला प्रदर्शनाच्या दिवशी काही खास कामगिरी करता आलेली नाही. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार 'इमर्जन्सी' सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २.४ कोटींचा गल्ला जमवला आहे. कंगनाच्या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील सुरुवात धिम्या गतीने झाली असली तरी येत्या वीकेंडला हा सिनेमा किती कमाई करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
'इमर्जन्सी' सिनेमात इंदिरा गांधींची भूमिका साकारण्याबरोबरच या सिनेमाचं दिग्दर्शनही कंगना रणौतने केलं आहे. या सिनेमात श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर, सतीश कौशिक यांची भूमिका आहे. या सिनेमातील कंगनाच्या अभिनयाचं प्रेक्षक कौतुक करत आहेत.