कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा आजपासून सगळीकडे रिलीज झालाय. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या राजकीय कारकीर्दीवर आधारीत हा सिनेमा आहे. 'इमर्जन्सी' सिनेमाची गेल्या वर्षभरापासून चर्चा आहे. अशातच 'इमर्जन्सी' सिनेमा रिलीज झाल्यावरच पंजाब राज्यातून सिनेमावर बंदीची मागणी करण्यात आलीय. शीख समुदायाची बदनामी करण्याचा आरोप करुन 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदीची मागणी करण्यात आलीय. काय आहे नेमकं प्रकरण?
'इमर्जन्सी' सिनेमावर बंदीची मागणी
काल गुरुवारी (१६ जानेवारी) 'इमर्जन्सी' सिनेमा रिलीजच्या एक दिवस आधी SGPC अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहिलं. यात त्यांनी सांगितलंय की, "पंजाबमध्ये इमर्जन्सनी सिनेमाच्या रिलीजला परवानगी देऊ नये. थिएटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यावर प्रतिबंध घालण्यात यावा. या सिनेमातून शीख समुदायाची बदनामी केली जात आहे."
याच पत्रात पुढे लिहिण्यात आलंय की, "शीखांच्या सर्वात पवित्र धर्मस्थळावरील हल्ल्याची आणि नरसंहाराची सत्यता लपवून समाजात विष पसरवण्याचं काम हा सिनेमा करतोय. त्यामुळे पंजाबमध्ये इमर्जन्सी सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्यात यावं अशी मागणी आम्ही करत आहोत. जर या सिनेमावर बंदी आणली गेली नाही तर आम्हाला कठोर विरोध दर्शवावा लागेल." या पत्रावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी अद्याप कोणतंही उत्तर दिलं नाहीये. त्यामुळे पंजाबमध्ये 'इमर्जन्सी' सिनेमा बॅन होणार की नाही? यावर अजून प्रश्नचिन्हच आहे. कंगना राणौतची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा आज १७ जानेवारीपासून भारतात रिलीज झालाय.