सुशांत सिंग राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूप्रकरणात अभिनेत्याच्या कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला (rhea chakraborty) आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. परंतु नुकतीच या प्रकरणात सीबीआयने रिया चक्रवर्तीला क्लीन चीट दिली. त्यामुळे रियावर जे आरोप लावण्यात आले त्यावर तूर्तास पडदा पडला. अशातच या सर्व प्रकरणात रियाला जो मानसिक त्रास सहन करावा लागला त्यानिमित्त दिया मिर्झाने (dia mirza) संताप व्यक्त केलाय. रियाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी दियाने केली आहे. काय म्हणाली दिया?
दिया मिर्झाने तिच्या सोशल मीडियावर याविषयी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये दिया लिहिते की, "कुठल्या मीडियामध्ये अशी हिंमत आहे की ते रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाची माफी मागतील? तुम्ही संशयिताविरोधात मोठं अभियान चालवलं. तुमच्या टीआरपीसाठी तुम्ही तिला मानसिक त्रास देऊन एका प्रकारचं शोषण केलं. त्यामुळे तिची माफी मागा. तुम्ही कमीत कमी एवढं तर करुच शकता." अशा शब्दात दियाने संताप व्यक्त केलाय.
१४ जून २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ४ वर्ष ४ महिन्यांनी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. विशेष म्हणजे या क्लोजर रिपोर्टमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चीट मिळाल्याचे वृत्त समोर आले. सुशांतच्या कुटुंबाने रिया चक्रवर्ती हिच्यावर आरोप लावले होते मात्र त्यात पुरावे आढळले नाहीत. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाने सुशांत सिंह राजपूतच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाने केला होता. या काळात रियाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सपोर्ट केला.