Join us
Daily Top 2Weekly Top 5

धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:08 IST

धर्मेद्र यांची प्रकृती सुधारत असून लवकरच त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसाचं सेलिब्रेशन खास पद्धतीने करण्यात येणार आहे

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना १० नोव्हेंबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर सध्या घरीच उपचार होत असून त्यांची काळजी घेतली जात आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनींनी खास अपडेट दिली आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन होणार

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनींनी नवीन माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, "सध्या त्यांची तब्येत ठीक आहे. आम्ही एक-एक दिवसावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहोत," असं हेमा मालिनी यांनी सांगितलं. धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने आता देओल कुटुंब आनंदी आहे. 'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, देओल कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीने सांगितलं की, ८ डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांचा ९० वा वाढदिवस साजरा करण्याची तयारी कुटुंबाने सुरू केली आहे.

धर्मेंद्र यांचा वाढदिवस ८ डिसेंबरला आहे, तर त्यांची मुलगी ईशा देओलचा वाढदिवस २ नोव्हेंबर रोजी होता. धर्मेंद्र यांच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे ईशाचा वाढदिवस साजरा करण्यात आला नव्हता. आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याने, सर्व कुटुंब मिळून डिसेंबरमध्ये या दोघांचा वाढदिवसांचा एकत्र साजरा करण्याचा प्लान करत आहेत.

रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यामागील कारण

धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असली तरी त्यांना घरी सोडण्यात आलं. धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, अभिनेत्याची पत्नी प्रकाश कौर आणि त्यांच्या मुलांनी आग्रह केल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. धर्मेंद्र यांना अधिक काळ कुटुंबासोबत आणि ज्या घरात त्यांनी जास्त वेळ घालवला आहे, तिथे ठेवून त्यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबाने डिस्चार्जचा निर्णय घेतला होता. सध्या डॉक्टरांची टीम घरी जाऊन त्यांच्यावर उपचार करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dharmendra's 90th Birthday Celebration Planned After Health Improvement; Hema Malini Updates

Web Summary : After recent hospitalization, Dharmendra's health is improving. Hema Malini shares positive updates. The Deol family is planning a grand 90th birthday celebration for Dharmendra on December 8th, combining it with Esha Deol's belated birthday festivities.
टॅग्स :धमेंद्रहेमा मालिनीइशा देओलसनी देओलबॉबी देओलबॉलिवूड