Dhanshree Verma On Divorce Rumours: भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि अभिनेत्री धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हे क्रिकेटविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. पण, सध्या मात्र त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. चहल्या आणि धनश्रीच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. युझवेंद्र चहलने काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. यानंतर अनेकांनी धनश्री वर्माला ट्रोल केलं. यावर आता धनश्री वर्मा चांगलीच संतापली आहे. धनश्रीने या चर्चांवर मौन सोडलं असून सडेतोड उत्तर दिलं आहे.
युजवेंद्र चहलसोबत असलेल्या मतभेदांवर धनश्री वर्माने पहिल्यांदाच भाष्य केलं. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिनं ट्रोलर्सना चोख उत्तर दिले आहे. "गेल्या काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. मला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे, तथ्य तपासणीशिवाय लोक माझ्या विरोधात लिखाण करत आहेत. द्वेष पसरवला जातोय. चेहरा नसलेल्या ट्रोलर्सकडून माझ्या प्रतिष्ठेची चारित्र्यहनन केलं जाणं अस्वस्थ करणारे आहे".
"मी माझंं नाव आणि प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम केले आहेत. मी शांत आहे म्हणजे मी दुर्बल आहे असं नाही, तर हे माझ्या ताकदीचे प्रमाण आहे. जेव्हा नकारात्मकता ऑनलाइन सहज पसरवली जाते, तेव्हा इतरांना उंचावण्यासाठी धैर्य आणि करुणा लागते. मी माझ्या सत्यावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि माझ्या मूल्यांना धरून पुढे पुढे जायचं ठरवलं आहे. कुठल्या स्पष्टीकरणाशिवाय सत्य नेहमीच आपल्या जागी ठामपणे ने उभं असतं. ओम नमः शिवाय", असे धनश्री तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.
धनश्रीनं युझवेंद्र चहलचा किंवा घटस्फोटाचा या पोस्टमध्ये कुठेही उल्लेख केला नाही. दरम्यान, युजवेंद्र आणि धनश्री यांची भेट ही लॉकडाऊनमध्ये झाली होती. युजवेंद्रेनं धनश्रीला डान्स शिकण्यासाठी संपर्क केला होता. लॉकडाऊनमध्ये सामने खेळले जात नव्हते. त्यामुळं या काळात डान्स शिकावा, असं युजवेंद्रेला वाटलं. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. २०२० मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. पण, आता लग्नाच्या चार वर्षानंतर दोघे वेगळे होत असल्याची चर्चा सुरू आहेत. युझवेंद्र आणि धनश्री या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांना अनफॉलो केलं आहे. युझवेंद्रनं इन्स्टाग्रामवरील धनश्रीसोबतचे फोटो डिलीट केले आहेत. धनश्रीच्या इन्स्टाग्रामवर अजूनही लग्नाचा फोटो आहे. ज्यामुळे या जोडप्यामध्ये काही मतभेद आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.