'शोले' सिनेमा माहित नाही असा एकही भारतीय प्रेक्षक आढळणार नाही. जसं भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे तसं भारताचा राष्ट्रीय सिनेमा हा 'शोले' आहे असं कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये वर्णन केलं होतं. 'शोले' सिनेमातील सर्वच व्यक्तिरेखा, प्रसंग, डायलॉग, गाणी प्रेक्षकांच्या अगदी तोंडपाठ आहेत. 'शोले' सिनेमातील एक सीन त्यावेळी सेन्सॉरने डिलिट केला होता. तो सीन सोशल मीडियावर अचानक ट्रेंडिंगवर आलाय. काय आहे हा सीन?
'शोले'मधील तो डिलिटेड सीन काय होता?
'शोले'मधील त्या डिलिटेड सीनचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. या सीनमध्ये दिसतं की डाकू गब्बर सिंग (अमझद खान) हा क्रूरपणे अहमदचे (सचिन पिळगांवकर) केस पकडताना दिसतो. अहमदच्या समोर जळती भट्टी दिसते. त्या भट्टीवर सळई दिसत असून त्यावर मांसाचे तुकडे भाजत असलेले दिसून येतात. अशाप्रकारे जळत्या भट्टीसमोर गब्बर अहमदला निर्दयीपणे मारताना दिसतो. या सीनमध्ये अत्यंत क्रूरता असल्याने हा सीन सेन्सॉरने त्यावेळी डिलिट केला होता.
अचानक हा सीन सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर एका पेजने या सीनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. हा फोटो समोर येताच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा फोटो अनेकांनी शेअर केल्याने आणि फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल्याने हा डिलिटेड सीन चांगलाच व्हायरल झालाय. सर्व डिलिटेड सीनसह 'शोले' पुन्हा रिलीज करा, अशी प्रेक्षकांनी मागणी केलीय. 'शोले' सिनेमात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन, अमजद खान, संजीव कुमार, सचिन पिळगांवकर हे कलाकार झळकले होते.