काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकरची (sai tamhankar) भूमिका असलेल्या 'डब्बा कार्टल' (dabba cartel) या वेबसीरिजचा टीझर भेटीला आला. या टीझरमध्ये भारतीय मनोरंजन विश्वातील अनेक लोकप्रिय नायिका पाहायला मिळाल्या. आज सईची भूमिका असलेल्या 'डब्बा कार्टल' वेबसीरिजचा ट्रेलर भेटीला आला आहे. मुंबईत खास अंदाजात 'डब्बा कार्टल'चा ट्रेलर लाँच झाला. डब्बे विकून घर चालवणाऱ्या महिलांची रहस्यमयी कहाणी 'डब्बा कार्टल' वेबसीरिजमध्ये बघायला मिळणार आहे.
'डब्बा कार्टल'ची चर्चा
वेबसीरिजमध्ये दिसतं की, डब्बा विकून काही गृहिणी घर चालवताना दिसतात. पण अचानक त्यांना पैसे कमावण्याचा मोह निर्माण होतो. हे पैसे कसे कमवायचे याचा मार्ग त्यांना सापडतो. तो म्हणजे, टिफिन सर्व्हिस देताना या महिला अंमली पदार्थांचा पुरवठा करतात. हळूहळू हे रॅकेट वाढत जातं. मग पुढे स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात या महिला कशा अडकतात, याची रंजक कहाणी 'डब्बा कार्टल' वेबसीरिजमध्ये पाहायला मिळतेय. सई ताम्हणकर या वेबसीरिजध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतेय.
कधी रिलीज होणार 'डब्बा कार्टल'?
'डब्बा कार्टल' या वेबसीरिजमध्ये सई ताम्हणकरसोबत शबाना आझमी, ज्योतिका, गजराज राव, शालिनी पांडे, अंजली आनंद, जिशू सेनगुप्ता या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. २८ फेब्रुवारीला ही वेबसीरिज रिलीज होणार आहे. फरहान अख्तर, रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या 'डब्बा कार्टल' वेबसीरिजच्या टीझरने लोकांची उत्सुकता वाढवली आहे. हितेश भाटिया यांनी या वेबसिरिजचं दिग्दर्शन केलंय. २८ फेब्रुवारीला ही वेबसीरिज रिलीज होणार आहे.