गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित या चित्रपटामधील छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि बलिदान पाहून प्रेक्षक भावूक होत आहेत. दरम्यान, छावा चित्रपट पाहिल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि बलिदान पाहून प्रभावित झालेला भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी येथील शिक्षण व्यवस्थेबाबत एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे.
आकाश चोप्रा याने छावा चित्रपट पाहिल्यानंतर एक्सवर एक पोस्ट लिहून हा प्रश्न विचारला आहे. आकाश चोप्रा लिहितो की, आज छावा चित्रपट पाहिला. शौर्य निस्वार्थत आमि कर्तव्यभावनेची ही अविश्वसनीय अशी कहाणी आहे. आता हा चित्रपट पाहून मला पडलेला प्रश्न म्हणजे आम्हाला शाळेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबाबत का शिकवलं गेलं नाही. कुठेच काही उल्लेख नाही.
आकाश चोप्रा याने अकबर आणि औरंजेबासह इतर मुघल बादशहांना दिल्या गेलेल्या महत्त्वाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तो म्हणाला की, आम्हाला शिकवण्यात आलं की, अकबर एक महान आणि निष्पक्ष सम्राट होता आणि इथे दिल्लीमध्ये औरंगजेब रोड नावाचा एक मुख्य मार्गही होता. असं का घडलं? असा सवाल आकाश चोप्रा याने विचारला.
दरम्यान, छावा हा चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच विकी कौशल याने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर महाराणी येसुबाईंची भूमिका रश्मिका मंदाना हिने साकारली आहे.