अभिनेत्री रेणुका शहाणे या हिंदी-मराठी इंडस्ट्री गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री. रेणुका यांनी आजवर विविध सिनेमांतून अभिनय केलाय. हसतमुख स्वभाव, सुंदर अभिनय अशी रेणुका शहाणेंची ओळख आहे. रेणुका शहाणेंचे पती आशुतोष राणा हे सुद्धा हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते. अनेकदा जाहीर इव्हेंटमध्ये रेणुका आणि आशुतोष एकत्र दिसतात. पण आजवरच्या कारकीर्दीत रेणुका आणि आशुतोष यांनी कधीच एकत्र काम केलं नाहीये. यामागचं कारण रेणुका यांनी सांगितलंय.
अमोल परचुरेंच्या कॅचअप या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे म्हणाल्या की, "मी आशुतोषजींसोबत अभिनेत्री म्हणून काम केलेलं नाहीये. काही ऑफर्स आल्यात. पण एक मॅरीड कपल असल्यामुळे ज्या गोष्टी आपण स्वीकारु शकतो. आता आमची मुलं पण आहेत त्यामुळे त्या गोष्टीचं भान ठेऊनच काही गोष्टी केल्या पाहिजेत. त्यामुळे तशा काही ऑफर्स नाही आल्या. आम्हाला एकमेकांसोबत काम करायची खूप इच्छा आहे."
"एकमेकांसोबत काम करायचं नाही, असं काहीच ठरवलेलं नाहीये. राणाजींचं काय होतं ना, त्यांच्याच काही चित्रपटांमध्ये बायकोची भूमिका आहे तर तुमच्याच बायकोला कास्ट करुया, असं सांगितलं जातं. ते म्हणतात सॉरी. रेणुका एक वेगळी व्यक्ती आहे. अभिनेत्री आहे. तिची वेगळी ओळख आहे. त्यामुळे सिनेमात ती माझ्या पत्नीची भूमिका करेल असं नाहीये. आमच्यात तसं नसतं." अशाप्रकारे आशुतोष यांच्यासोबत आजवर काम का केलं नाही, याचा खुलासा रेणुका शहाणेंनी केलाय.