बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’चा अधिकृत टीझर प्रदर्शित झाला असून, मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा तोच वेडेपणा, गोंधळ आणि हास्याची मेजवानी परत आली आहे. दिग्गज कलाकारांच्या कॉमिक टायमिंगने भरलेला हा टीझर एका उत्कृष्ट फॅमिली एंटरटेनरची खात्री देतो. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारच्या स्टायलिश पोस्टरनंतर आता टीझरमुळे चित्रपटातील मजेशीर वातावरणाची झलक दाखवली आहे. अक्षय कुमारला पुन्हा एकदा कॉमेडी अवतारात पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
‘वेलकम टू द जंगल’च्या ट्रेलरमध्ये दिसतं की, एका जंगलात सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. यानिमित्ताने एकापेक्षा एक अतरंगी माणसं एकत्र येऊन शूटिंग करतात. त्यानंतर त्यांच्यात होणारी भांडणं आणि उडणारी धमाल ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटात बघायला मिळणार आहे.
कलाकारांची तगडी फळी
या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी, दिशा पाटनी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, परेश रावल, रवीना टंडन, लारा दत्ता, फरीदा जलाल, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, राजपाल यादव, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, दलेर मेहंदी, आफताब शिवदासानी, मुकेश तिवारी, यशपाल शर्मा, किरण कुमार, झाकीर हुसेन, विंदू दारा सिंह, उर्वशी रौतेला, हेमंत पांडे, ब्रिजेंद्र काला, फिरोज खान (अर्जुन), स्वर्गीय पंकज धीर जी, पुनीत इस्सर, सुदेश बेरी, जीतू वर्मा, वृही कोडवारा, आदित्य सिंग आणि भाग्य भानुशाली यांचा समावेश आहे.
अहमद खान यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपट ए. ए. नाडियाडवाला, केप ऑफ गुड फिल्म्स आणि स्टार स्टुडिओ १८ यांनी सीता फिल्म्स आणि राकेश डांग यांच्या सहकार्याने सादर केला आहे. बेस इंडस्ट्रीज ग्रुप प्रॉडक्शनच्या या चित्रपटाची निर्मिती राकेश डांग आणि वेदांत विकास बाली यांनी केली असून चित्रपटाचे निर्माते फिरोज ए. नाडियाडवाला आहेत. ‘वेलकम टू द जंगल’ २६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.