Prime Minister Narendra Modi's Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवस आहे. या खास निमित्ताने, अभिनेता विवेक ओबेरॉयनं एक मोठा संकल्प केला आहे. तो गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करणार आहे. या शिबिरात ३ लाख युनिटपेक्षा जास्त रक्त गोळा करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे.
विवेक ओबेरॉयनं आयएएनएसशी बोलताना शिबिराबद्दल माहिती दिली. तो म्हणाला, "अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद गेल्या ११ वर्षांपासून ही मोहीम राबवत आहे. आम्ही २०१४ मध्ये याची सुरुवात केली होती आणि मी या मोहिमेचा पहिला राजदूत आणि रक्तदाता होतो. त्यावेळी आम्ही १,००,२१२ युनिट रक्तदान करून एक विक्रम केला होता".
विवेक ओबेरॉयनं पुढे सांगितले की, "यावर्षीचे रक्तदान शिबिर खूपच खास असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, आम्ही ७५००० रक्तदात्यांना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सहभागी करून घेणार आहोत. याशिवाय, जगभरातील ७५ देशांमधील ७५०० केंद्रांवर रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील".
स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना विवेक ओबेरॉय म्हणाला की, "पूर्वी मला सुईची भीती वाटायची, पण रक्तदानाचे महत्त्व कळल्यानंतर मी दरवर्षी रक्तदान करू लागलो. रक्तदान केल्यानंतर मला सुपरमॅनसारखे वाटतं. पंतप्रधानांनी देशासाठी केलेल्या कार्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपणही देशासाठी काहीतरी चांगले करण्याचा संकल्प केला पाहिजे". दरम्यान, विवेक ओबेरॉयनं २०१९ मध्ये 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटात पंतप्रधानांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं होतं.