Join us

'त्या दिवसानंतर त्यांचं वागणं बदललं'; घरची परिस्थिती पाहून विक्रांत मेस्सीच्या मित्रांनी केली होती चेष्टा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 14:40 IST

Vikrant massey: एक काळ असा होता जेव्हा त्याची घरची परिस्थिती पाहून त्याच्या मित्रांनीच त्याच्याकडे पाठ फिरवली होती.

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या त्याच्या  '12 th fail' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच हा सिनेमा प्रदर्शित झाला असून विक्रांतच्या अभिनयाचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या या सिनेमाच्या निमित्ताने सध्या विक्रांतची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या काही जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या विक्रांतला खरी ओळख मालिकांमुळेच मिळाली. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं. विशेष म्हणजे दमदार अभिनय शैलीच्या जोरावर त्याचं नाण इंडस्ट्रीमध्येही खणखणीतपणे वाजलं. मात्र, एक काळ असा होता जेव्हा त्याची घरची परिस्थिती पाहून त्याच्या मित्रांनीच त्याच्याकडे पाठ फिरवली होती.

'कोईमोई'च्या रिपोर्टनुसार, विक्रांतच्या जवळच्या मित्रांनीच त्याच्या घरच्या परिस्थितीची खिल्ली उडवली होती. इतकंच नाही तर त्यांनी व्हॉट्स अॅप ग्रुपवरही त्याची चर्चा केली, गॉसिप केलं. मात्र, मित्रांच्या बदलेल्या या वागणुकीमुळे तो एक नवा धडा शिकला असंही त्याने सांगितलं.

 घरची परिस्थिती पाहून मित्रांनी फिरवली पाठ

विक्रांतने एकदा त्याच्या जवळच्या मित्रांना घरी जेवायला बोलावलं होतं. विक्रांतची आई स्वयंपाक छान करायची त्यामुळे त्याने मुद्दाम मित्रांना जेवायला बोलावलं. त्यावेळी त्याच्या घरची आर्थिक  परिस्थिती फारशी चांगली नव्हती. मित्रांना ही परिस्थिती कळल्यानंतर त्यांच्यासाठी विक्रांत चेष्टेचा विषय ठरला."मी त्यावेळी माझ्या मित्रांना माझ्या घरी जेवायला बोलावलं होतं. ते माझे खूप जवळचे मित्र होते. ते माझे मित्र आहेत हे सांगताना मला त्यांचा अभिमान वाटायचा. पण ते ज्या पद्धतीने वागले त्यातून मला त्यांच्या मानसिकतेविषयी कळलं. माझी आई फार उत्तम स्वयंपाक करायची त्यामुळे मी त्या सगळ्यांना जेवायला बोलावलं. ते माझ्या घरी आले आणि माझ्या घरची परिस्थिती पाहून निराश झाले. आमच्याकडे प्लास्टिकच्या खुर्च्या होत्या. भिंतींचा रंग निघाला होता, छताचे पोपडे पडले होते. माझ्या घराचं हे चित्र पाहून त्यांचं वागणं एका दिवसात बदललं", असं विक्रांत म्हणाला. 

पुढे तो म्हणतो, "आमचं स्वयंपाकघर देखील त्यांच्या मानाने फारसं स्वच्छ नव्हतं. त्या दिवशी ते आमच्याकडे जेवले आणि एका तासामध्ये वेगवेगळी कारणं सांगून सगळे निघून गेले." दरम्यान, विक्रांतने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यात ‘धरम-वीर’, ‘बालिका वधू’, आणि ‘कुबुल है’ या मालिका त्याच्या विशेष गाजल्या. विक्रांतने 'मिर्झापूर', 'क्रिमिनल जस्टिस' या गाजलेल्या वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.

टॅग्स :विक्रांत मेसीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा