Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 10:54 IST

विक्रांतने त्याला सोशल मीडियावर धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला.

'12th फेल' फेम अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. 'द साबरमती रिपोर्ट' मध्ये तो मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. त्याच्यासोबत राशी खन्ना आणि रिद्धी डोगराही मुख्य भूमिकेत आहेत. नुकतंच सिनेमाचा ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी विक्रांतने त्याला सोशल मीडियावर धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला.

विक्रांत मेस्सी 'द साबरमती रिपोर्ट' मध्ये स्थानिक पत्रकाराच्या भूमिकेत आहे. २००२ साली झालेल्या गोध्रा ट्रेन अग्रीकांड प्रकरणानंतरच्या सत्य घटनेवर सिनेमा आधारित आहे. एकता कपूरने सिनेमाची निर्मिती केली असून धीरज सरना यांनी दिग्दर्शित केला आहे. ट्रेलर लाँचवेळी विक्रांत म्हणाला, "मला धमक्या मिळत आहेत. याकडे लक्ष न देता मी हे सांगू शकतो की ही अशी गोष्ट आहे ज्याला मी सामोरा जातोय आणि आमची टीमही सामोरी जात आहे." गोध्रा घटनेनंतर गुजरात मध्ये झालेल्या दंगलीबाबत विक्रांत म्हणाला, "आम्ही कलाकार आहोत आणि आम्ही गोष्ट सांगतो. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. दुर्भाग्याने तुम्ही अजून सिनेमा बघितलेलाच नाही त्याआधीच तुम्ही पूर्वग्रह मनात धरला आहे."

तर एकता कपूर म्हणाली, "मी कधीच कोणत्या धर्माबाबत टिप्पणी करणार नाही कारण मी एक हिंदू आहे. मी सर्व धर्मांचा आदर करते. तुम्ही सिनेमा बघितला पाहिजे. कोणत्याही धर्माचं नाव  न घेता किंवा त्या धर्माला ठेच न पोहोचवता मी दोषींचं नाव घेतलं आहे."

'द साबरमती रिपोर्ट' १५ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. विक्रांत मेस्सीने पुन्हा एकदा त्याच्या अप्रतिम अभिनयाचं सादरीकरण केलं आहे. नुकताच त्याचा 'फिर आयी हसीन दिलरुबा' सिनेमा रिलीज झाला.

टॅग्स :विक्रांत मेसीबॉलिवूडगुजरातसोशल मीडिया