Join us

याला म्हणतात संस्कार! भर कार्यक्रमात आई-वडिलांच्या पाया पडला विकी कौशल, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 14:26 IST

'सॅम बहादूर'च्या स्पेशल स्क्रिनिंगला विकीचे आईवडील आणि पत्नी कतरिना कैफही उपस्थित होती. सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या आगामी 'सॅम बहादूर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शुक्रवारी(१ डिसेंबर) सॅम बहादूर हा बहुचर्चित सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सध्या विकी 'सॅम बहादूर'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'सॅम बहादूर'चं स्पेशल स्क्रिनिंगही मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. सिनेमाच्या या स्पेशल स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक सिताऱ्यांनी हजेरी लावली होती. तसंच विकीचे कुटुंबीयदेखील या स्क्रिनिंगसाठी उपस्थित होते. 

'सॅम बहादूर'च्या स्पेशल स्क्रिनिंगला विकीचे आईवडील आणि पत्नी कतरिना कैफही उपस्थित होती. सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. 'सॅम बहादूर'च्या स्पेशल स्क्रिनिंगला आईबाबांनी हजेरी लावताच विकी कौशल त्यांच्या पाया पडला. भर कार्यक्रमात विकीने आईवडिलांना वाकून नमस्कार केला. त्याच्या या कृतीचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. 'इन्स्टंट बॉलिवूड' या इन्स्टाग्राम पेजवरुन विकीचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. 

या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत विकीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. "किती चांगले संस्कार आहेत," असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "संस्कार" अशी कमेंट केली आहे. "चांगल्या पद्धतीने वाढवलं आहे," असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. 

'सॅम बहादूर' चित्रपट भारतीय लष्कर अधिकारी सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमातून त्यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. या सिनेमात विकी कौशलने मुख्य भूमिकेत असून सान्या मल्होत्रा, फातिमा शेख यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :विकी कौशलसेलिब्रिटीसिनेमा