अभिनेता विकी कौशलचे वडील श्याम कौशल (Sham Kaushal) हे बॉलिवूडमध्ये अॅक्शन दिग्दर्शक आणि स्टंटमॅन होते. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये स्टंट दृश्ये केली आहेत. काही दिवसांपूर्वी एका स्टंटमॅनचा स्टंट करताना जीव गेला. त्यांनी व्हिडिओ शेअर करत दु:ख व्यक्त केलं होतं. श्याम कौशल यांना काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. कॅन्सर झाल्यावर श्याम कौशल यांच्या मनात आत्महत्येचे विचार आले होते असा त्यांनी नुकताच खुलासा केला. ते नक्की काय म्हणाले?
अमन औजलाला दिलेल्या मुलाखतीत श्याम कौशल यांनी २००३ साली घडलेली घटना आठवली. त्यांना कॅन्सर झाल्याचं समजलं. यातून वाचण्याची शक्यता कमी आहे असंही डॉक्टर म्हणाले होते. प्रत्येक जण त्यांच्याकडे सांत्वनेच्या, सहानुभूतीच्या भावनेतून पाहत होते. ते म्हणाले, "मला डॉक्टरांनी जेव्हा कॅन्सर असल्याचं सांगितलं तेव्हा वाटलं त्याच रुग्णालयाच्या मजल्यावरुन उडी मारुन जीव देऊ. मी हा निर्णय कमजोरीतून घेत नव्हतो पण मला वाटत होतं की जर कॅन्सरने मरायचंच आहे तर आताच का नाही? सर्जरीनंतर ज्या वेदना होत होत्या त्यामुळे मला हलताही येत नव्हतं."
ते पुढे म्हणाले, "मी देवाकडे प्रार्थना करायचो की मला आताच बोलवून घे. पण पुढच्याच दिवशी माझ्यामध्ये हिंमत आली. माझा मृत्यूची भीती निघून गेली. काही सर्जरीचीच तर गोष्ट आहे नंतर मी ठीक होऊन जाईन हाच विचार केला. या घटनेनंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. माझी इच्छाशक्ती आणखी मजबूत झाली."
"डॉक्टर पुढचे १ वर्ष माझी टेस्ट आणि सर्जरी करत होते. मी हिंमत सोडली नाही. नशीब बलवत्तर कॅन्सर माझ्या शरिरातून गेला. मग मी देवाकडे प्रार्थना केली की मला आणखी १० वर्ष दे. आज त्या गोष्टीला २२ वर्ष झाली आहेत आणि कॅन्सर पुन्हा शरिरात शिरलेला नाही. यानंतर माझं आयुष्यच बदललं. मी अनेक चांगल्या लोकांना भेटलो. मुलांनीही त्यांच्या करिअरमध्ये चांगलं काम केलं.", असंही ते म्हणाले.