विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा या सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. या सिनेमात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी विकीने कठोर मेहनत घेतली आहे. त्याने शरीरयष्टीसाठीही भरपूर व्यायाम केला आहे. याचे काही फोटो आणि व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
विकीने शेअर केलेल्या 'छावा' सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच्या या पोस्टमधील एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओत विकी जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. जीममध्ये लल्लाटी भंडार हे गाणं लागलं आहे. जीममध्ये सायकलिंग करत असताना विकीने हा व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये तो गाण्यावर एन्जॉय करताना दिसत आहे. लल्लाटी भंडार हे गाणं विकी बोलताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी विकीचं कौतुक केलं आहे. मराठी गाण्यावर विकी एन्जॉय करताना पाहून चाहत्यांनाही आनंद झाला आहे.
दरम्यान, 'छावा' सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विकीसोबत रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे. लक्ष्मण उत्तेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'छावा'मध्ये सुव्रत जोशी, नीलकांती पाटेकर, शुभंकर एकबोटे, सारंग साठ्ये, संतोष जुवेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.