Join us

विकी कौशलने भाभी हाक मारल्यावर अशी होती दीपिका पादुकोणची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 18:03 IST

झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन विकी कौशल आणि कार्तिक आर्यन यांनी केले होते. दीपिका आणि रणवीर स्टेजवर आल्यानंतर विकी आणि कार्तिकने या दोघांची चांगलीच टर उडवली.

ठळक मुद्देरणवीर आणि दीपिका यांच्या लग्नाच्या फोटोंमध्ये फोटोशोप करून स्वतःला टाकले होते. तसेच त्या दोघांना स्टेजवरच त्यांनी फेरे घ्यायला लावले आणि त्यानंतर दीपिकाला त्याने चक्क दीपिका भाभी म्हणून हाक मारली.

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी काही महिन्यांपूर्वी इटलीमध्ये लग्न केले आणि त्यानंतर खास त्यांच्या बॉलिवूडमधील मित्रमैत्रिणींसाठी मुंबईत रिसेप्शन आयोजित केले होते. या रिसेप्शनच्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सने दीपिकाला भाभी अशी हाक मारली होती. त्यावेळी त्यांची ही हाक ऐकून दीपिकाच्या चेहऱ्यावर एक छानसे हास्य पाहायला मिळाले होते. हा व्हिडिओ देखील त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. असेच काहीसे पुन्हा एकदा नुकतेच दीपिकासोबत घडले आहे. 

झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन विकी कौशल आणि कार्तिक आर्यन यांनी केले होते. दीपिका आणि रणवीर स्टेजवर आल्यानंतर विकी आणि कार्तिकने या दोघांची चांगलीच टर उडवली. त्यांनी रणवीर आणि दीपिका यांच्या लग्नाच्या फोटोंमध्ये फोटोशोप करून स्वतःला टाकले होते. तसेच त्या दोघांना स्टेजवरच त्यांनी फेरे घ्यायला लावले आणि त्यानंतर दीपिकाला त्याने चक्क दीपिका भाभी म्हणून हाक मारली. डीएनए या वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार दीपिकाला विकीने भाभी अशी हाक मारल्यानंतर दीपिकासोबतच उपस्थित सगळ्यांनाच त्यांचे हसू आवरत नव्हते. 

या पुरस्कार सोहळ्यात दीपिका, रणवीर आणि विकी या तिघांना देखील पुरस्कार मिळाले. विकीला संजू या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता, रणवीर सिंगला पद्मावत चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर दीपिकाला पद्मावत या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

विकी कौशलला उरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. विकीने संजू या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. पद्मावत या चित्रपटात देखील विकी झळकणार असल्याच्या बातम्या त्यावेळी मीडियात आल्या होत्या. विकी या चित्रपटात रावल रतन सिंग ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. पण विकी ऐवजी एखाद्या प्रस्थापित अभिनेत्याला ही भूमिका द्यावी असे त्यावेळी दीपिकाने सांगितले असल्याचे म्हटले गेले होते. विकी या चित्रपटाचा भाग होता की नाही याबाबत विकी अथवा दीपिकाकडून कधीच काहीही सांगण्यात आले नाही.

टॅग्स :दीपिका पादुकोणविकी कौशलरणबीर कपूररणवीर सिंग