Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी त्यांना शेवटची भेटले तेव्हा..."; ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी सांगितली भावुक आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 14:32 IST

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. आशा ताईंना शेवटच्या वेळी पाहिले तेव्हाची आठवण सांगताना सायरा बानो अत्यंत भावुक झाल्या होत्या.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. आशा ताईंसोबत शेवटची भेट झाली, तेव्हाची आठवण सांगताना सायरा बानो अत्यंत भावुक झाल्या होत्या. आशाजींच्या जाण्याने सायरा बानो यांना मोठा धक्का बसला आहे. 

आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सायरा बानो पुढे म्हणाल्या, "आमची शेवटची भेट झाली जेव्हा मी त्यांच्याशी बोलले होते. तेव्हा कल्पनाही नव्हती की त्या इतक्या लवकर आजारी पडतील. मला खूपच धक्का बसला आहे. मला आठवतंय, मी त्यांना शेवटचं अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात पाहिलं होतं. त्या वेळी त्या खूपच अशक्त दिसत होत्या. त्यांना त्या अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटलं होतं. त्या अचानक इतक्या आजारी पडतील, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं."

"नुकत्याच झालेल्या रमजानच्या महिन्यातही मी त्यांना भेटले होते. मी त्यांची एक मुलाखत पाहिली होती, ज्यामध्ये त्या रमजान, ईद आणि उपवासाबाबत बोलत होत्या. त्यांचे ते विचार ऐकून मी थक्क झाले. त्यांनी माणसांमधील एकतेचा किती सुंदर संदेश दिला होता! ते ऐकून मला इतका आनंद झाला की, मी स्वतःहून त्यांना फोन केला होता."

या वेळी सायरा बानो यांनी आशा भोसले यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीची आठवणही सांगितली. त्या म्हणाल्या, "आशाजींना मी पहिल्यांदा एका गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान भेटले होते. त्या काळी रेकॉर्डिंग स्टुडिओच्या बाहेर लाईव्ह ऑर्केस्ट्रा असायचा आणि गायकांसाठी माईकसह बसायला छोटी जागा असायची. आशाजी, लताजी, मोहम्मद रफी साहेब आणि मुकेशजी हे सगळे इतके चांगले लोक होते की, ते आम्हा कलाकारांना त्यांच्यासोबत तिथे बसू द्यायचे. आम्ही अनेक गाण्यांच्या लाईव्ह रेकॉर्डिंग्ज जवळून पाहिल्या आहेत."

सायरा बानो यांनी पुढे सांगितले, "गाणं रेकॉर्ड करताना आशाजी मधूनच मला खुणावत असत. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की, त्या माझ्यासाठी स्वतःचा आवाज थोडा बारीक करत आहेत. मी त्यावेळी चित्रपटसृष्टीत नवीन होते. शाळेतून थेट चित्रपटांमध्ये आले होते. मी खूप सडपातळ होते आणि माझा आवाजही तसाच बारीक होता. त्यामुळेच आशाजींनी आपल्या आवाजातून माझं व्यक्तिमत्व हुबेहूब पकडलं होतं."

English
हिंदी सारांश
Web Title : Saira Banu Remembers Last Meeting with Asha Bhosle, Shares Memories

Web Summary : Saira Banu mourns Asha Bhosle's death, recalling their last meeting at Arjun Tendulkar's wedding. She fondly remembers Bhosle's unifying message during Ramadan and their early encounters during live recordings, where Bhosle adjusted her voice to match Banu's youthful persona.
टॅग्स :आशा भोसलेसायरा बानूबॉलिवूडमृत्यू