Join us

Manoj Kumar: ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 08:28 IST

Manoj Kumar Passes Away: हिंदी चित्रपटसृष्टीत ‘भारत’ कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज निधन झाले आहे.

Manoj Kumar Death: हिंदी चित्रपटसृष्टीत ‘भारत’ कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज निधन झाले आहे. मनोज कुमार यांनी वयाच्या ८७ वर्षी मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते मनोज कुमार यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटामुळे त्यांना एक वेगळी ओळखही मिळाली. आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या अभिनेत्याने अभिनयासोबतही इतरही बऱ्याच क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण केली.

देशभक्तिपर चित्रपटांमुळे मनोज कुमार यांना नवी ओळख मिळाली. चाहत्यांनी त्यांना भारत कुमार हे नाव दिले. ‘मेरे देश की धरती’ या त्यांच्या गाण्याचे स्वर कानावर पडताच त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. या अभिनेत्याने आज जगाचा निरोप घेतला आहे. 

मनोज कुमार यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडचा एक काळ  गाजवला. आजही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या एबटाबाद येथे झाला होता. 'हरियाली और रास्ता', 'वो कौन थी', 'हिमालय की गोद में', 'दो बदन', 'उपकार', 'पत्थर के सनम', 'नील कमल', 'पूरब और पश्चिम', 'रोटी कपडा और मकान', 'क्रांती' हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :मनोज कुमारबॉलिवूडसेलिब्रिटीमृत्यू