Sohum Shah: 'तुंबाड' फेम अभिनेता सोहम शाह एक वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. आतपर्यंत सोहमनं 'तुंबाड', 'दहाड' आणि 'महाराणी' सारेख चित्रपट दिले आहेत. सध्या सोहम शाह त्याच्या नव्या 'CrazXy' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २८ फेब्रुवारी २०२५ ला देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सोहम शाह एका नवीन अवतारात दिसतोय. 'CrazXy' ला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे या चित्रपटातील नवीन गाणं 'गोली मार भेजे में' सध्या ट्रेंड होतं आहे.
सोहम शाह 'CrazXy' सिनेमाच्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. अलिकडेच त्यानं इंडियन एक्सप्रेसच्या 'द सुवीर सरन' शोमध्ये फिल्मी करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा केली. यावेळी त्यानं राजकारण हा विषय आवडीचा असल्याचं म्हटलं. तो म्हणाला, "मला राजकारण आवडतं. कारण, त्यातून तुमच्याकडे शक्ती येते आणि त्यामुळं तुम्ही लोकांच्या आयुष्यात चांगले बदल घडवू शकतात. मला समाजसेवा करायला आवडतं".
पुढे तो म्हणाला, "माझी फार इच्छा आहे. पण, मी आता नुसतं बोलतोय, पण, ते शब्दातून कार्यात उतरेल तेव्हा खरं. शीख धर्मात जो सेवा भाव आहे, ते मला प्रचंड आवडतो. बूट पॉलिश करणं, लोकांना जेवण देणं, म्हणजे जेव्हा दुसऱ्या व्यक्तीपुढे आपण झुकतो, तेव्हा तुमचं सर्व व्यवस्थित होतं. मला वाटतं सत्तेच्या माध्यमातून तुम्ही लोकांची सेवा करु शकता. राजकीय क्षेत्रात काम करण्याची समज मला आहे. पण, सध्या रस नाहीये".
सोहम शाहचा 'क्रेझी' हा चित्रपट गिरीश कोहली यांनी दिग्दर्शित केला आहे. 'CrazXy' या चित्रपटाद्वारे गिरीश दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. याआधी त्यांनी 'मॉम' आणि 'केसरी' सारखे चित्रपट लिहिले आहेत. या चित्रपटाचा निर्माता सोहम शाहच आहे. या चित्रपटानं 'छावा'च्या वादळातही चांगली कमाई केली आहे. सिनेमाची कथा आणि सोहम शाहचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.