Join us

तापसी पन्नू कंगनावर चांगलीच भडकली, 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत केली पोलखोल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 18:06 IST

बॉलिवूड माफियांनी सुशांतचे करिअर संपवले असे कंगना राणौतचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देतापसीने शेअर केलेल्या एका व्हिडिओत कंगना महेश भट्ट यांनीच आपल्याला पहिला ब्रेक दिल्याचं सांगत आहे

मुंबई - सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर दोन व्यक्ति चांगल्याच चर्चेत अन् वादग्रस्त आहेत. एक म्हणजे करण जोहर आणि दुसरी म्हणजे कंगना राणौत. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने नेपोटिजमचा मुद्दा उचलून धरला आणि तिच्या आरोपांनी बॉलिवूडमधील वातावरण तापले. एका मुलाखतीत तिने पुन्हा बॉलिवूड आणि बॉलिवूडच्या काही जणांवर तोंडसुख घेतले. दिग्दर्शक अनुराग कश्यपला 'मिनी महेश भट' असं तिने म्हटलंय. तर, स्वरा भास्कर आणि तापसी पन्नू यांनाही चापलूसी करणाऱ्या असं संबोधलंय. त्यावरुन, आता तापसीनेही कंगनाची पोलखोल करायला सुरुवात केलीय.   

बॉलिवूड माफियांनी सुशांतचे करिअर संपवले असे कंगना राणौतचे म्हणणे आहे. करण जोहर आणि इतर दिग्दर्शकांमुळे सुशांतने जीव दिला, असे कंगनाचे म्हणणे आहे. आता मात्र तिने तापसी पन्नूकडे मोर्चा वळवला असून तापसीवरही तिने अनेक आरोप केलेत. त्यावर तापसीनेही कंगनाची ‘शाळा’ घेतल्याचे दिसून येतंय. 

कंगनाने तापसी पन्नूला बी-ग्रेड अभिनेत्री म्हणून संबोधले. तिने सांगितले,‘तापसीसारखे लोक तर म्हणतील की, त्यांना नेपोटिजममुळे काही फरक पडत नाही. तिला करण जोहर खुप पसंत आहे. परंतु, अशी बी ग्रेड अभिनेत्री जी दिसायला ठीक आहे, तिला काम का मिळत नाही? तुझं असणंच नेपोटिजमचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. तसेच, तापसी व स्वरा भास्कर या चापलूसी करणाऱ्या असल्याचाही आरोप तिने केला. त्यावर, तापसीनेही कंगनाचे जुने व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर करायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये महेश भट्ट यांनी मला पहिला ब्रेक दिल्याचं कंगना सांगत आहे. 

तापसीने पहिल्यांदा टिवट केले की,‘मला कळालं की, आता दहावी आणि बारावीनंतर आमचाही निकाल जाहीर झालाय...आता आपला ग्रेड सिस्टीम ऑफिशिअल झाले आहे. परंतु, आत्तापर्यंत तर नंबर सिस्टीमवर व्हॅल्यू ठरवल्या जात होती ना?’. त्यानंतर, तापसीने पुन्हा एकदा कंगनाचे जुने मुलाखतीतील व्हिडिओ शेअर करत मी आता अतिशय कन्फूज झाल्याचं म्हटलं आहे. मी नेमकं कुठल्या बाजूने आहे हेच मला कळत नाही, असे म्हणत तापसीने कंगनाची खिल्ली उडवली आहे. 

तापसीने शेअर केलेल्या एका व्हिडिओत कंगना महेश भट्ट यांनीच आपल्याला पहिला ब्रेक दिल्याचं सांगत आहे. तर, दुसऱ्या व्हिडिओत बॉलिवूडमधील स्टार्सच्या मुलांसाठी असलेल्या कोट्याबद्दल बोलत आहे. माझे पंजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, आजोबा आयएएस अधिकारी होते, वडिल उद्योजक तर आई शिक्षिका होती. त्यामुळे मला, या विशेष अधिकारात असल्यास हरकत नाही, असे म्हटले होते.  

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडसुशांत सिंग