Suniel Shetty on pak actors banned: काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला. या घटनेत २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एकानंतर एक कारवाई केली. सिंधू पाणी करार रद्द केला, सीमेवर त्यांच्या सैनिकांना लक्ष्य केलं. शिवाय पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईकही केला. १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनल्स आणि अनेक पाक कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारतात बॅन झाले आहेत. यावर आता अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानी कलाकारांबाबत भारताने घेतलेल्या निर्णयांची सध्या मनोरंजनविश्वात चर्चा सुरु आहे. यावर नुकतंच सुनील शेट्टी म्हणाला, "आपल्या देशाची शांतता भंग करणाऱ्या आणि निष्पाप लोकांचा जीव घेण्याचा कट रचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बंदी आणली पाहिजे. क्रिकेट, फिल्म, प्रत्येक क्षेत्रात प्रतिबंध आणले पाहिजे. आधी तर जे चुकीचं झालं आहे ते नीट करा. यानंतर आपोआप सगळं ठीक होईल. आम्ही भारतीय धर्मालाच कर्म आणि सेवा मानतो."
आपली एकच जबाबदारी
तो पुढे म्हणाला, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या देशाच्या सैनिकांवर आता सर्व जबाबदारी सोपवली आहे. त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. मला वाटतं आपली सेना तेच करेल जे योग्य आहे. आपण सगळे एकजुट आहोत आणि कोणालाच आपल्या देशात नकारात्मकता पसरवण्याची परवानगी नाही. जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला सध्या इतकंच करायचं आहे."
सुनील शेट्टी आगामी 'केसरी वीर' सिनेमात दिसणार आहे. १६ मे रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. सध्या तो या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.