Join us

Mahesh Babu: साऊथ सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर, आईचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 10:07 IST

Mahesh Babu: साऊथ सुपरस्टार महेश बाबू याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज (28 सप्टेंबर) पहाटे 4 च्या सुमारास त्याच्या आईचं निधन झालं.

साऊथ सुपरस्टार महेश बाबू याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज (28 सप्टेंबर) पहाटे 4 च्या सुमारास त्याच्या आईचं निधन झालं. महेशबाबूची आई इंदिरा देवी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.  हैदराबादेतील एआयजी हॉस्पीटलमध्ये त्या भरती होत्या. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वी महेश बाबूचा मोठा भाऊ रमेश बाबू याचं निधन झालं. त्या दु:खातून सावरत नाही तोच महेशबाबूवर दुसरा आघात झाला आहे.

इंदिरा देवी यांच्या पश्चात तीन मुली आणि एक मुलगा (महेश बाबू) असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा रमेश बाबू यांचे यावर्षी जानेवारी महिन्यात निधन झालं. महेशच्या कुटुंबीयांसाठी या वर्षातील हा दुसरा मोठा धक्का आहे. 

महेश बाबूच्या कुटुंबीयांनी इंदिरा देवी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. सुपरस्टार महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांचं पार्थिव आज सकाळी 9 वाजता पद्मालय स्टुडिओमध्ये चाहत्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून नंतर महाप्रस्थानम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती महेश बाबूच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

दरम्यान साऊथ इंडस्ट्रीतल्या अनेकांनी महेशबाबूच्या आईच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. महेश बाबूच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.  महेश बाबूने मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केलं आहे. दोघांना  एक मुलगा आणि मुलगी आहे.

टॅग्स :महेश बाबूबॉलिवूडTollywood