पंजाबमध्ये पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेपूरग्रस्तांसाठी पुढाकार घेत मदतीचा हात दिला आहे. अभिनेता सध्या पंजाबमध्ये असून पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करत आहे. बोटीतून घरोघरी जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. "रोटी का कर्ज चुकाना है" असं म्हणत तो मदत करत आहे.
सोनू सूदने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. 'मेरा पंजाब' असं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्याने पंजाबच्या काही पूरग्रस्त गावांना भेट दिली. व्हिडिओमध्ये सोनू म्हणतो की, "आज आम्ही सकाळपासून अनेक गावांना भेट दिली आहे आणि जेव्हा आम्ही एखाद्या कुटुंबाच्या घरात जातो तेव्हा ते आम्हाला जेवणाबद्दल विचारतात, तु्म्ही चहा किंवा दूध पिणार का असं आपुलकीने विचारतात."
"जो शेतकरी आपल्याला चपाती, भाकरी देतो... संपूर्ण देशाला देतो, त्या शेतकऱ्याचं पीक या पाण्याखाली आहे. हे पाणी वाहून जाईल, ते कमी होईल, पण त्यांच्यासाठी जे आवश्यक आहे त्या गरजा वाढतील. म्हणून आपल्याला एकत्र येऊन यांच्यासाठी काम करायचं आहे. आपल्यावर असलेलं हे कर्ज आपल्याला फेडावं लागेल."
सोनू सूद हा त्या मोजक्या सेलिब्रिटींपैकी एक आहे जो नेहमीच सामाजिक कार्यात पुढे राहतो. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि हजारो कामगार वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकले होते, तेव्हाही सोनू सूदने लोकांना मदत केली आणि हजारो लोकांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवलं. तेव्हापासून लोक त्याला देवदूत म्हणतात. त्याच्या कामाचं नेहमीच भरभरून कौतुक होत असतं.