बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या पत्नीच्या कारचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. या घटनेनंतर अभिनेत्याने सर्वांना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो लोकांना एक महत्त्वाचं आवाहन करताना दिसत आहे. कारमध्ये सीट बेल्ट लावण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. या अभिनेत्याने लोकांना आठवण करून दिली की, सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीट बेल्ट महत्त्वाचे आहेत, मग ते कारमध्ये कुठेही बसलेले असोत.
"सीट बेल्ट नाही तर कुटुंब नाही. मागच्या सीटवर बसलेले असाल तरी सीट बेल्ट लावा" असं सोनूने व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये एक मोठा अपघात झाला. माझी पत्नी आणि तिची बहीण कारमध्ये होत्या आणि कारचा अपघात झाला. तुम्हाला माहित आहे, जर त्यांना कोणी वाचवलं असेल तर ते सीट बेल्ट आहेत. मागच्या सीटवर बसलेलं असताना सीट बेल्ट न लावणाऱ्यांसाठीही ही घटना एक धडा आहे असं अभिनेत्याने सांगितलं.
अपघाताच्या घटनेबाबत अभिनेत्याने म्हटलं आहे की, घटनेच्या दिवशी माझी पत्नी सोनालीने सुनीताला सीट बेल्ट लावण्यास सांगितलं. तिने सीट बेल्ट लावला आणि एका मिनिटानंतर अपघात झाला. तिघेही सुरक्षित होते कारण त्यांनी सीट बेल्ट लावला होता. अभिनेत्याची पत्नी, तिची बहिणी आणि भाच्यासोबत प्रवास करत होती.
"मागच्या सीटवर बसलेल्या १०० लोकांपैकी ९९% लोक कधीही सीट बेल्ट लावत नाहीत, त्यांना वाटतं की ही समोर बसलेल्या व्यक्तीची जबाबदारी आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की सीट बेल्ट न लावता कधीही कारमध्ये बसू नका. बहुतेक ड्रायव्हर पोलिसांना दाखवण्यासाठी सीट बेल्ट लावतात, पण माझ्यावर विश्वास ठेवा, सीट बेल्ट तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करतात" असं सोनू सूदने म्हटलं आहे. २४ मार्च रोजी सोनू सूदची पत्नी सोनाली सूदच्या कारला अपघात झाला.