अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) गेल्या वर्षी जून महिन्यात बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत रजिस्टर मॅरेज केलं. सोनाक्षीने आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे तिच्यावर खूप टीका झाली. इतकंच नाही तर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा, दोन्ही भाऊ सगळेच तिच्या या निर्णयाच्या विरोधात होते अशी चर्चा झाली. सोनाक्षीचे भाऊ लव आणि कुश तर आजही तिच्यासोबत कोणत्याच इव्हेंटला येत नाहीत. दरम्यान आता नुकतंच सोनाक्षीने एका मुलाखतीत आंतरधर्मीय लग्नावर भाष्य केलं आहे.
हॉटरफ्लाय ला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, "जहीर आणि मी धर्माचा विचारही करत नव्हतो. एक मुलगा आणि एक मुलगी आहे जे एकमेकांवर प्रेम करतात. त्यांना लग्न करायचं आहे आणि त्यांनी ते केलं. तो त्याच्या धर्म माझ्यावर लादत नाही आणि मीही नाही. महत्वाचं म्हणजे आमच्यात कधीच याबद्दल बोलणंही झालं नाही. आम्ही एकमेकांच्या धर्माचा आदर करतो त्यामुळे ते आपसुकच झालं. ते त्यांच्या परंपरा पाळतात आणि मी माझ्या घरी आपल्या परंपरा पाळते. आमच्या घरी दिवाळी पूजेत तो येऊन बसतो. त्याच्या घरी मी नियाजसाठी जाऊन बसते. बास! एवढंच तर गरजेचं आहे. मी त्यांचा आणि त्यांच्या संस्कृतीचा आदर करते आणि त्याचंही संपूर्ण कुटुंब आमच्या संस्कृतीचा आदर करतात. असंच असायला पाहिजे."
मी हिंदूच आहे
"स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत आमचं लग्न होणं हेच योग्य होतं. आम्ही तेच केलं. मला माझा हिंदू धर्म बदलायची गरज नाही आणि त्यालाही इस्लाम बदलायची गरज नाही. दोन लोक ज्यांचा एकमेकांसोबत इतका सुंदर बाँड आहे त्यांनी लग्न केलंय इतकं हे साधं आहे. मी धर्मपरिवर्तन करणार का? हा प्रश्नच येत नाही. आम्ही प्रेम करतो आणि लग्न करतोय एवढंच आहे."