Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सात महिन्यांची गरोदर असताना तिने..."; स्मिता पाटील यांच्या मैत्रिणीने सांगितली अभिनेत्रीची भावुक आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:07 IST

स्मिता पाटील यांच्या निधनापूर्वीचे शेवटचे दिवस कसे होते याचा खुलासा अभिनेत्रीच्या जवळच्या मैत्रिणीने केला आहे.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतही ज्यांच्या अभिनयाचा दबदबा होता त्या म्हणजे स्मिता पाटील. वयाच्या ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. स्मिता पाटील त्यांच्या कारकीर्दीत अनेक सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मन जिंकलं. स्मिता पाटील यांच्या निधनापूर्वीचे शेवटचे दिवस कसे होते याचा खुलासा अभिनेत्रीच्या जवळच्या मैत्रिणीने केला आहे. 

१३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिता पाटील यांचं निधन झालं. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर त्यांची जवळची मैत्रीण आणि चित्रपट निर्मात्या अरुणा राजे यांनी अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यातील संघर्षावर आणि शेवटच्या क्षणांवर प्रकाश टाकला आहे.

अरुणा राजे यांच्या सांगण्यानुसार, स्मिता पाटील यांचे शेवटचे दिवस खूप एकटेपणात गेले. राज बब्बर आधीच नादिरा बब्बर यांच्याशी विवाहित होते आणि त्यांना मुलेही होती. राज यांच्यासोबतच्या या नात्यामुळे स्मिता यांचे मित्र-मैत्रीण आणि कुटुंबीय त्यांच्यापासून दूर गेले होते. अरुणा राजे म्हणाल्या, "मी एकमेव अशी व्यक्ती होती जी तिच्या संपर्कात होती. ती खूप एकटी पडली होती आणि आपल्या आयुष्यातील कटू आठवणी व कठीण प्रसंग माझ्याशी शेअर करायची."

हृदयद्रावक शेवटचे क्षण

स्मिता यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच अरुणा राजे तातडीने जसलोक रुग्णालयात पोहोचल्या. ई-टाइम्सशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "मी स्मिताला ज्या अवस्थेत पाहिले, त्याचे वर्णन मी शब्दांत करू शकत नाही. मला जाणीव झाली होती की ती आपल्याला सोडून गेली आहे. तिची आई पूर्णपणे खचली होती, पण चिमुकल्या प्रतीकसाठी त्यांना स्वतःला सावरावे लागले."

स्मिता यांच्या निधनानंतर त्यांच्या आईने अभिनेत्रीची काही पत्रे आणि नोट्स अरुणा राजे यांच्याकडे सोपवल्या होत्या. त्या वाचताना स्मिता यांचे राज बब्बर यांच्यावर असलेले अतोनात प्रेम समोर आले. अरुणा सांगतात, "स्मिता राज यांच्या प्रेमात अक्षरशः वेड्या होत्या. सात महिन्यांची गरोदर असताना आणि प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी राज यांच्यासाठी 'करवा चौथ'चा उपवास धरला होता. त्यांच्या प्रेमात एक प्रकारची ओढ आणि वेडेपण होते."

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लग्न केले आणि त्यांना प्रतीक हा मुलगा झाला. मात्र, स्मिता यांच्या अकाली निधनानंतर राज बब्बर पुन्हा आपली पहिली पत्नी नादिरा यांच्याकडे परतले. प्रतीक बब्बर हा आज सुप्रसिद्ध अभिनेता आहे. प्रतीकने काहीच दिवसांपूर्वी लग्न केले पण त्याने या लग्नात वडील राज बब्बर किंवा सावत्र भावांना बोलावलं नव्हतं. प्रतीक सोशल मीडियावर आईच्या आठवणी जागवताना दिसतो. 

टॅग्स :स्मिता पाटीलराज बब्बरप्रतीक बब्बरबॉलिवूडमृत्यू