आसामी गायक जुबीन गर्गचं सिंगापूर येथे निधन झालं. स्कुबा डायव्हिंग करताना त्याचा मृत्यू झास्याची धक्कादायक बातमी आली. जुबीन फक्त ५२ वर्षांचा होता. त्याने अनेक हिंदी सिनेमांमध्येही पार्श्वगायन केलं होतं. 'गँगस्टर'मधलं 'या अली' हे त्याचं सर्वात लोकप्रिय झालेलं गाणं होतं. 'आसामचा रॉकस्टार' अशी त्याची ओळख होती. जुबीन सिंगापूर दौऱ्यावर होता. तिथे त्याचे काही परफॉर्मन्स झाले होते. तर दोन दिवसात त्याची आणखी एक कॉन्सर्ट होती. त्याआधीच त्याने जगाचा निरोप घेतला. जुबीनच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच चाहतेही हळहळले आहेत.
सोशल मीडियावर जुबीन गर्गचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याने लाईफ जॅकेट घातलं असून तो हसत हसतच पाण्यात उतरताना दिसत आहे. त्याच्यासोब काही लोकही आहेत. जुबीन पोहण्याचा आनंद घेताना दिसतोय. नंतर स्कुबा डायव्हिंग करतानाच त्याची तब्येत बिघडली. त्याला तातडीने सीपीआर देण्याचा प्रयत्नही करण्यात आला. नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दुपारी २ च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
काल आसामच्या आरोग्य मंत्र्यांनी ट्वीट करत जुबीनच्या निधनाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्वीट करत जुबीनला श्रद्धांजली वाहिली. तसंच संगती जगतातील पपॉन, प्रीतम, विशाल ददलानी, अभिजीत सावंत या संगीतकार, गायकांनीही शोक व्यक्त केला. जुबीनचं पार्थिवा लवकरच सिंगापूरहून गुवाहाटी येथे आणण्यात येणार आहे. तर आसाममध्ये काल जुबीनच्या चाहत्यांनी त्याच्या आठवणीत कँडल मार्च काढला.