Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी ३ वर्ष लग्न लपवलं अन् आता एकमेकांना केलं अनफॉलो? लोकप्रिय गायिकेच्या घटस्फोटाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:36 IST

प्रसिद्ध गायिकेच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे

गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत होत्या. अशातच एक प्रसिद्ध गायिका आपल्या पतीपासून वेगळं होणार असल्याचं बोललं जातंय. ही गायिका आहे मोनाली ठाकूर. 'सवार लूं' आणि 'मोह मोह के धागे' यांसारख्या हिट गाण्यांमुळे प्रसिद्ध झालेली बॉलिवूडची पार्श्वगायिका मोनाली ठाकूर सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून ती पती माईक रिक्टरसोबत घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता या चर्चांना आणखी उधाण आलंय, कारण मोनालीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

मोनाली घेणार घटस्फोट?

२०१७ मध्ये स्वित्झर्लंडमधील एक हॉटेल व्यावसायिक माईक रिक्टरसोबत मोनालीने गुपचूप लग्न केले होते, ज्याचा खुलासा तिने तीन वर्षांनंतर २०२० मध्ये केला. आता, लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे. या चर्चांना तेव्हा सुरुवात झाली, जेव्हा मोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती माईकला 'अनफॉलो' केले. याशिवाय मोनालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर 'द रीझन' या शीर्षकाखाली एका म्युझिक व्हिडिओची झलक शेअर केली.

या व्हिडिओमध्ये भावनिक आणि शारीरिक अत्याचाराचे दृश्य दिसत आहेत, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मोनालीने या गाण्याला 'माझं आतापर्यंतचे सर्वात आवडीचं काम' म्हटले आहे.

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगण्यात आलंय की, मोनाली आणि रिक्टर एकमेकांसोबत गेली अनेक वर्ष दूर राहत आहे. त्यामुळेच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. सध्या, या दोघांनीही घटस्फोटाच्या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो करणं आणि मोनालीने शेअर केलेली पोस्ट या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आणखी बळ मिळत आहे. चाहत्यांना अशी आशा आहे की, मोनाली स्वतः लवकरच यावर स्पष्टीकरण देऊन खुलासा करेल.

टॅग्स :घटस्फोटलग्न