Join us

"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 11:11 IST

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याने पहिल्यांदाच त्यांच्या मोठ्या मुलाबद्दल भावुक खुलासा केला. मोठ्या मुलाचं ११ वर्षांचा असताना निधन झाल्याने या अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अभिनेते शेखर सुमन (shekhar suman) हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते. शेखर सुमन यांना आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलं आहेच शिवाय 'मुव्हर्स अँड शेकर्स' सारख्या शोमधून शेखर यांनी खुमासदार सूत्रसंचालन करुन सर्वांवर छाप पाडली आहे. शेखर सुमन यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्याबद्दल भावुक खुलासा केला. शेखर सुमन यांचा मोठा मुलगा ११ वर्षांचा असताना जग सोडून गेला. त्यानंतर शेखर सुमन यांनी त्यांच्या देव्हाऱ्यातील मूर्ती हटवल्या होत्या. काय म्हणाले शेखर सुमन

शेखर सुमन यांचा मोठा खुलासा

कनेक्ट एफएम कनाडाला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमन यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल खुलासा केला. शेखर यांचा मोठा मुलगा आयुषला गंभीर आजार झाला होता. तो बरा व्हावा आणि काहीतरी चमत्कार घडावा म्हणून शेखर सुमन दररोज देवाकडे प्रार्थना करायचे. मुलाची शारीरिक अवस्था त्यांना बघवत नव्हती. परंतु अशाही परिस्थितीत शब्द दिला असल्याने शेखर सुमन यांनी शूटिंगला जाणं सुरुच ठेवलं. एकदा शेखर शूटिंगला जात असताना त्यांच्या मुलाने शेखर यांचा हात पकडून "बाबा, आज नका जाऊ, प्लीज" असं सांगितलं. "मी लवकर परत येईन", असं म्हणत शेखर मुलाचा निरोप घेऊन निघून गेले.

आजही मुलाची आठवण मनात

काही दिवसांनी शेखर यांचा ११ वर्षांचा मुलगा आयुषचं निधन झालं. मुलाच्या निधनामुळे शेखर सुमन मानसिकरित्या खचले. त्यांनी घरातील देव्हारा बंद करुन सर्व मूर्ती हटवल्या. "निरागस मुलाला ज्याने माझ्यापासून हिरावून घेतलं आणि मला मोठं दुःख दिलं अशा देवावर मी आता विश्वास ठेऊ शकत नाही", असं शेखर सुमन म्हणाले. "आजही मी पूर्ण बरा झालो नाहीय, मला रोज आयुषची आठवण येते", असं शेखर सुमन म्हणाले. शेखर सुमन यांचा धाकटा मुलगा अध्ययन सुमनही अभिनेता आहे.

टॅग्स :शेखर सुमनबॉलिवूडटेलिव्हिजन