Sharvari Wagh in Flower Market Dadar: जे शब्दांत लिहिता येत नाही, जे बोलण्यातून व्यक्त होत नाही, एक हजार शब्द जेवढं सांगू शकत नाहीत, तेवढं किंवा त्याहीपेक्षा कितीतरी जास्त फक्त एक समर्पक एक फोटो सांगून जातो. असेच काही सुंदर फोटो दादरमधील गजबजलेल्या फुलबाजारात (Flower Market Dadar) मराठमोळ्या शर्वरी वाघनं (Sharvari Wagh) टिपले आहेत. या सुंदर क्षणांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
जगभरातील लोकांचे हृदयस्पर्शी फोटो आणि व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेले फोटोग्राफर सुतेज सिंग पन्नू यांनी मुंबईतील प्रतिष्ठित दादर फुलबाजारात शर्वरीसोबत एक खास सकाळ घालवली. फुलविक्रेत्यांसाठी ही सकाळ खूपच खास ठरली आहे. शर्वरीनं फुलविक्रेत्यांशी मनमोकळा संवाद साधला. फक्त संवादच नाही, तर तिने स्वतः कॅमेरा हाती घेतला आणि त्यांचे नैसर्गिक भाव कॅप्चर केले. आपला इतका सुंदर फोटो पाहून फुलविक्रेत्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद उमटल्याचं पाहायला मिळालं.
शर्वरीसाठी हा अनुभव खूप खास ठरला. ती म्हणाली, "माझ्या चेहऱ्यावरही हास्य उमटलं. असे निरागस क्षण खूप खास असतात आणि त्यांना हसवणे हा माझ्यासाठी आजचा सर्वोत्तम क्षण ठरला". या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केलाय. शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. लवकरच ती 'अल्फा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.