Join us

कान्स रेड कार्पेटवर शर्मिला टागोर यांच्या साधेपणाने जिंकलं मन, हिरव्या साडीत दिसल्या खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 10:43 IST

अभिनेत्री सिमी गरेवाल यांचीही उपस्थिती, सत्यजीत रे यांच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी पोहोचल्या दिग्गज अभिनेत्री

फ्रान्समध्ये प्रतिष्ठित कान्स फेस्टिव्हलला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली. देशविदेशातील अनेक सेलिब्रिटींनी सोहळ्याला हजेरी लावली. भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनीही कान्स रेड कार्पेटवर हजेरी लावली. त्यांच्या साधेपणावर सर्वांच्याच नजरा खिळल्या. रेशमी साडीत त्या खूपच सुंदर दिसत होत्या. कोणतंही वेस्टर्न आऊटफिट न घालता त्यांनी साध्या साडीलाच पसंती दिली हे पाहून चाहते भारावले आहेत.

शर्मिला टागोर (Sharmila Tagore)आणि सिमी गरेवाल (Simi Garewal) या दिग्गज अभिनेत्रींनी कान्स रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. सत्यजीत रे यांचा 'अरनयेर दिन रात्रि' या ऐतिहासिक सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी त्यांनी कान्समध्ये हजेरी लावली. सत्यजीत रे यांच्या सिनेमांचे चाहते असलेले वेस एंडरसन यांनी सिनेमा प्रेझेंट केला. शर्मिला टागोर यांनी गोल्डन काठ असलेली हिरवी साडी नेसली होती. यावर गोल्डन क्लच, नाजूक कानातले त्यांनी परिधान केले. यात त्यांच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे. साध्या पण तितक्याच शाही अंदाजात त्यांनी हजेरी लावली.  तर सिमी गरेवाल यांनी व्हाईट लूक केला होता. बेबी पिंक गाऊन आणि त्यावर लांब कोट घातला होता. सुंदर नेकलेसही घातला होता. बोल्ड आणि एलिगंट असं कॉम्बिनेशन दिसत होतं. दोघींना पाहून सर्वांनी त्यांच्या सौंदर्याची आणि साधेपणाची स्तुती केली.

शर्मिला टागोर यांची लेक सबा पटौदीने फ्रेंच रिवेराचे फोटो शेअर केले आहेत. तिने इन्स्टाग्रामवर लिहिले, 'कान्स २०२५! आई आणि मी ...अविस्मरणीय क्षण."

शर्मिला टागोर यांनी यापूर्वी २००९ साली कान्समध्ये ज्युरी म्हणून हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांचं कान्सशी जुनं नातं आहे. आज पुन्हा इतक्या वर्षांनी त्या  ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर झळकल्या.

टॅग्स :शर्मिला टागोरसिमी गरेवालबॉलिवूडसिनेमाकान्स फिल्म फेस्टिवल