अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने (Ibrahim Ali Khan) 'नादानियां' सिनेमातून पदार्पण केलं. काही दिवसांपूर्वीच त्याचा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. या सिनेमात तो खुशी कपूरसोबत झळकला. दरम्यान सिनेमाची कथा, दोघांचा अभिनय यावर प्रचंड टीका झाली. कोणालाही 'नादानियां' आवडला नाही. यामध्ये दीया मिर्झा, जुगल हंसराज, सुनील शेट्टी, महिमा चौधरी यांचीही भूमिका होती. लोकांना उलट यांचंच काम आवडलं. आता इब्राहिमची आजी शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी सुद्धा नातवाच्या सिनेमाला वाईट म्हटलं आहे.
शर्मिला टागोर यांनी नुकतीच सारा आणि इब्राहिम या नातवंडांच्या करिअरवर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "मला माझ्या दोन्ही नातवंडांवर गर्व आहे. दोघंही कमाल काम करत आहेत. इब्राहिमचा नादानियां सिनेमा चांगला नव्हता. पण त्यात तो खूप हँडसम दिसत आहे. त्याने पूर्ण प्रयत्न केले. मी सर्वांसमोर हे सांगू नये पण प्रामाणिकपणे बोलायचं तर सिनेमा वाईट होता. शेवटी सिनेमा चांगला असला पाहिजे तरच त्याचा अर्थ आहे." साराचं कौतुक करताना त्या म्हणाल्या, "सारा खूप चांगली अभिनेत्री आहे. ती मेहनती आहे. सक्षम आहे. ती यात नक्कीच यशस्वी होईल."
शर्मिला टागोर वयाच्या ८० व्या वर्षीही काम करत आहेत. २०२३ साली त्यांचा गुलमोहर रिलीज झाला होता. सिनेमात मनोज वाजपेयींनी त्यांच्या मुलाची भूमिका साकारली. तर आता नुकताच त्यांचा 'पुरात्वन' हा बंगाली सिनेमा आला आहे. १५ वर्षांनी त्यांनी बंगाली सिनेसृष्टीत कमबॅक केलं आहे. आजही त्यांची पडद्यावरची जादू कायम आहे.