Join us

Video : नरेंद्र मोदींना ७५ व्या वाढदिवसानिमित्त शाहरुख खाननं दिल्या शुभेच्छा, म्हणाला "तुमची ऊर्जा आणि उत्साह तरुणांनाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 14:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस असून जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.

ShahRukh Khan Wish Pm Modi On 75th Birthday:  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर २०२५) ७५ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देशासह जगभरातून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहेत.  या खास प्रसंगी राजकीय नेत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानही यात मागे राहिला नाही. त्याने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वृत्तसंस्था एएनआयने इन्स्टाग्रामवर शाहरुखचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख पंतप्रधान मोदींबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसत आहे. शाहरुख म्हणाला, "आज आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस आहे. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. सर, एका छोट्या शहरातून जागतिक स्तरावर पोहोचलेला तुमचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. यातून तुमची शिस्त, कठोर परिश्रम आणि देशाप्रती असलेले समर्पण दिसतं. विशेष म्हणजे, ७५ व्या वर्षीही तुमची ऊर्जा आणि उत्साह आमच्यासारख्या तरुणांनाही मागे टाकतो. तुम्ही नेहमीच निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी राहावे अशी मी प्रार्थना करतो". शाहरुख खानच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या 'किंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे अर्धे चित्रीकरण पूर्ण झाले आहे, तर उर्वरित काम लवकरच सुरू होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.  या सिनेमात शाहरुखची लाडकी लेक सुहाना देखील असणार आहे. पहिल्यांदाच ती वडिलांसोबत ऑनस्क्रीन काम करणार आहे. सुहानाचा सिनेमात अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. या सिनेमाकडून शाहरुख आणि त्याच्या चाहत्यांनाही खूप अपेक्षा आहे. सिनेमात जयदीप अहलावत, अभय वर्मा, अभिषेक बच्चन यांचीही भूमिका आहे. तसंच दीपिका पादुकोणचा कॅमिओ असल्याची चर्चा आहे.  

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडनरेंद्र मोदी