किंग खान शाहरुखच्या (Shahrukh Khan) सुपरहिट सिनेमांचं नाव घ्यायचं तर अनेक नावं येतील. 'देवदास', 'कल हो ना हो, 'डर', 'मै हूँ ना' आणि अजून बरेच. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' सिनेमाचा एक अजब किस्सा आहे. सिनेमाच्या शूटिंगवेळी मुंबईतील अनेक लग्नच रखडली होती. नक्की काय झालं होतं?
'देवदास'चे सिनेमॅटोग्राफर बिनोद प्रधान यांनी नुकतीच फ्रायडे टॉकीजला मुलाखत दिली. तेव्हा त्यांनी सिनेमाचा इंटरेस्टिंग किस्सा सांगितला. ते म्हणाले,"सेटवरची भव्यता पाहून मी थक्क झालो होतो. चंद्रमुखीच्या कोठीचा सेट बनवणं खूप कठीण होतं. १ किलोमीटर लांब असा तो सेट होता. मी टीमसोबत सेट बघण्यासाठी पोहोचलो. सेटवर प्रकाश कसा आणायचा याचा आम्ही विचार करत होतो. मी तलावाच्या बाजून सेटभोवती चक्कर मारली आणि असिस्टंटला सेटच्या शेवटी १०० वॉल्टचा बल्ब लावायला सांगितलं."
...अन् लग्नच रखडली
"ते पुढे म्हणाले,"आम्ही सेटची लायटिंग करत होतो. अख्ख्या मुंबई शहरात जितके जनरेटर्स होते त्या सगळ्याचा वापर केला. यामुळे मुंबईतील कित्येक लग्न पुढे ढकलली गेली. कारण लग्नात लावायला जनरेटरच राहिले नव्हते."
५० कोटींचं बजेट
'देवदास' सिनेमा २००२ साली रिलीज झाला. ५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने तब्बल १६८ कोटींची कमाई केली. शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित या सिनेमानंतर स्टार झाले होते.