Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 14:18 IST

राजकुमार रावला नक्की असं का म्हणाला शाहरुख?

शाहरुख खानचा (Shahrukh Khan)  मुंबईतील बांद्रा स्थित 'मन्नत' बंगला जगप्रसिद्ध आहे. शाहरुखने 2001 साली म्हणजेच २३ वर्षांपूर्वी सर्व जमापुंजी पणाला लावून हा बंगला विकत घेतला होता. तेव्हा त्याने १३ कोटींना खरेदी केलेल्या या बंगल्याची आजची किंमत जवळपास 200 कोटी आहे. बंगला खरेदी केल्यानंतर शाहरुखकडे इंटेरियर डिझाईन करण्यासाठीही पैसे राहिले नव्हते. तेव्हा त्याची बायको गौरी खानने स्वत:च याचं इंटिरियर केलं होतं. इंडस्ट्रीतील नवोदित अभिनेत्यांना शाहरुख खानकडून प्रेरणा मिळते. शाहरुखने एक दिवस अभिनेता राजकुमार रावला (Rajkumar Rao)  घर घेण्यापूर्वी महत्वाचा सल्ला दिला होता.

राजकुमार रावने 2010 साली LSD सिनेमातून पदार्पण केलं. कोणीही गॉडफादर नसताना तो या इंडस्ट्रीत आला. आज तो यशस्वी अभिनेता आहे. २०१७ साली फोर्ब्सच्या सेलिब्रिटी 100 लिस्टमध्ये त्याचं नाव होतं. राजकुमार हरियाणाच्या गुरुग्रामचा आहे. अभिनय करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत आला. या मायानगरीत स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं तसंच त्याचंही होतं. आज तो आलिशान बंगल्याचा मालक आहे. यामागे शाहरुखचीच प्रेरणा होती असं तो म्हणाला आहे.

'मॅशेबल'ला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार म्हणाला, "शाहरुख सरांनी मला एक सल्ला दिला होता जो माझं आयुष्य बदलणारा ठरला. ते म्हणाले होते की बेटा कधीही घर घेशील ना तेव्हा लायकीपेक्षा थोडं मोठं घे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपोआपच तू तितकी मेहनतही घेशील. मेहनत घेतलीस तर देवही तुझी साथ देईल. मला त्यांची ही गोष्ट खूप आवडली. मी त्यांचा हा सल्ला लक्षात ठेवला होता."

तो पुढे म्हणाला, "माझं मुंबईत घर घ्यायचं स्वप्न आता कुठे पूर्ण झालंय. मी आणि पत्रलेखाने खूप प्रेमाने हे घर सजवलं आहे." २०२२ मध्ये त्याने जुहू एक फ्लॅट खरेदी केला. जान्हवी कपूरकडून त्याने हा फ्लॅट घेतला होता. ३४५६ चौरस फूट असा आलिशान हा फ्लॅट आहे. तब्बल 44 कोटी रुपयांमध्ये ही डील झाली होती.

राजकुमार राव सध्या  'श्रीकांत' सिनेमामुळे चर्चेत आहे. तसंच त्याचा आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही','स्त्री 2' हे चित्रपट रांगेत आहेत.

टॅग्स :राजकुमार रावशाहरुख खानसुंदर गृहनियोजनमुंबईबॉलिवूड