Shah Rukh Khan Praises Pm Modi : अभिनेता शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वांत प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. त्याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. तो सोशल मीडियावर काय पोस्ट करतो, याकडे नेटकऱ्यांचं लक्ष असतं. नुकतंच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत एक पोस्ट शेअर केली. ज्यावरुन तो सध्या प्रचंड ट्रोल होतोय.
येत्या फेब्रुवारीमध्ये 'ग्लोबल ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट' (WAVES) आयोजित होणार आहे. 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान जगभरातील कलाकार दिल्लीत जमणार आहेत. देश आणि जगाच्या निर्मात्यांना WAVES जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचं 'मन की बात' कार्यक्रमात मोदींनी सांगितलं. यावर 'किंग खान' शाहरुखने नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.
पीएम मोदींच्या एक्स अकाउंटवर यासंदर्भात व्हिडीओही शेअर करण्यात आला. जो व्हिडीओ शेअर करत शाहरुख खानने लिहलं, मी मोठ्या आतुरतेने आपल्या देशातच होणाऱ्या 'ग्लोबल ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट'ची वाट पाहत आहे. हा एक असा प्रसंग आहे, जो फिल्म इंडस्ट्रीचा उत्सव साजरा करतोय .तसेच सॉफ्ट पॉवर म्हणून फिल्म इंडस्ट्रीची ताकद ओळखतोय आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील भूमिका स्पष्ट करतोय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चॅम्पियन आणि सर्जनशीलतेला चालना देणारा ही एक खास वेळ आहे", असं म्हणत शाहरुखने ही पोस्ट नरेंद्र मोदी यांना टॅग केली.
शाहरुख खानने हे ट्विट करताच लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एकाने कमेंट करत शाहरुखला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर ट्विट का केले नाही, असा सवाल केला. तर एकाने लिहलं, "कॅमेऱ्यासमोर तुम्ही डॉन, किंग, बादशाह आणि काहीही बनू शकता. पण, तुम्ही खऱ्या आयुष्यात भ्याड आहात". दरम्यान, केवळ शाहरुख खानच नाही तर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, संजय दत्त, अनिल कपूर यांनीही पंतप्रधान मोदींचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.