बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानचा आज वाढदिवस. सलमान आज ५९ वर्षांचा झालाय. भाइजानच्या वाढदिवसानिमित्त त्याचे जगभरातील करोडो चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाचा टीझर आज भाइजानच्या वाढदिवशी रिलीज होणार होता. पण काल भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याने टीझर रिलीजबाबत निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतलाय.
या दिवशी रिलीज होणार 'सिकंदर'चा टीझर
सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाचा टीझर आज भाइजानच्या वाढदिवसानिमित्त रिलीज होणार होता. परंतु आता या टीझरबाबत मोठी अपडेट समोर आलीय. काल डॉ.मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याने निर्मात्यांनी टीझर रिलीजची डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. आज ११ वाजता रिलीज होणारा 'सिकंदर'चा टीझर आता उद्या २८ डिसेंबरला सकाळी ११ वाजून ७ मिनिटांनी रिलीज होणार आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांना आणखी काही तास 'सिकंदर'चा टीझरसाठी वाट पाहावी लागणार आहे.
'सिकंदर' सिनेमाविषयी
सलमान खानचा गेल्या काही वर्षातील बहुचर्चित सिनेमांपैकी एक म्हणजे 'सिकंदर' सिनेमा. या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. 'किक'नंतर अनेक वर्षांनी सलमान आणि साजिद एकत्र काम करत आहेत. 'सिकंदर' सिनेमात सलमान खानसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिका साकारणार आहे. 'गजनी' फेम ए.आर.मुरुगोदास 'सिकंदर' सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. हा सिनेमा २०२५ च्या ईदला भेटीला येणार आहे.